साईमत | मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील आणि राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भाजपकडून या दाव्याचे तात्काळ खंडन करण्यात आले असून फडणवीस महाराष्ट्रातच राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रातील राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राज्यातील घडामोडींसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढलेल्या दिल्ली दौऱ्यांमुळेही या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी केंद्रात येण्याबाबत चर्चा केल्याचे सांगितले. देशाला सक्षम शिक्षणमंत्री हवा असून त्यासाठी फडणवीस हे योग्य नाव असल्याचे पंतप्रधानांच्या मनात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, केंद्रात मनुष्यबळ विकास (शिक्षण) मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती फडणवीस यांना करण्यात आल्याचेही राऊत यांनी म्हटले.
इतकेच नव्हे तर, फडणवीस यांनी केंद्रात जाण्यास सहमती दर्शविल्यास महाराष्ट्रात त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री नियुक्त केला जाईल, असे आश्वासनही पंतप्रधानांनी दिल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध शक्यता व्यक्त केल्या जाऊ लागल्या असून सत्तांतर, मंत्रिमंडळ विस्तार आणि नेतृत्वबदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
दरम्यान, भाजपने या सर्व दाव्यांना फेटाळून लावले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या विधानावर टीका करत, “राऊत यांना हा तिसरा डोळा कुठून मिळाला, हेच समजत नाही. त्यांनी केलेल्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असे स्पष्ट केले.
बावनकुळे पुढे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सक्षम आणि दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री आहेत. विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे नेतृत्व राज्याला आवश्यक आहे. त्यामुळे ते केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना कोणताही आधार नाही.”
सध्या संजय राऊत यांच्या दाव्यांवरून राजकीय वातावरण तापले असले, तरी भाजपने ते स्पष्टपणे फेटाळल्याने पुढील काही दिवसांत केंद्र आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत स्तरावर कोणतीही घोषणा झालेली नसल्याने या चर्चांकडे राजकीय दावे-प्रतिदावे म्हणूनच पाहिले जात आहे.
