खोल दरीत पडल्याने २३ वर्षीय अभिषेक कुशवाहचा दुर्दैवी अंत; पावसाळी पर्यटन करताना सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
साईमत न्यूज नेटवर्क –
खोपोली (रायगड) : सोशल मीडियासाठी रिल्स आणि फोटो काढण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला. ठाण्यातील २३ वर्षीय तरुणाचा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील धबधब्यावरून खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अभिषेक कुशवाह असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अभिषेक कुशवाह हा आपल्या तीन मित्रांसोबत खोपोली येथील केपी धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी गेला होता. निसर्गरम्य परिसरात फोटो आणि व्हिडीओ काढत असताना त्यांनी काही वेळ घालवला. त्यानंतर धबधब्यावरून परतत असताना अचानक अभिषेकचा पाय घसरला आणि तो सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळला.
अचानक घडलेल्या या घटनेने त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने मदतीसाठी आरडाओरड करत स्थानिकांची मदत घेतली. घटनेची माहिती मिळताच खोपोली येथील हेल्प फाऊंडेशनच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, अनेक तासांच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री अभिषेकचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, पावसाळ्यात धबधबे, घाट परिसर आणि डोंगराळ भागात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, धोकादायक ठिकाणी सेल्फी, फोटो आणि रिल्स बनवण्याच्या प्रयत्नात अनेकदा जीवघेण्या दुर्घटना घडतात. खोपोलीतील या घटनेने पुन्हा एकदा अशा ठिकाणी सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
पोलिसांनी नागरिकांना आणि पर्यटकांना धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच फोटो व व्हिडीओ काढताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. अभिषेकचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
