साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्यासरकारच्या सत्तास्थापनेबाबत नवी माहिती समोर येत आहे ,फडणवीस सरकारची शपथविधी १ जुलै ला होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर भाजपाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रविण दरेकर, मुनगंटीवार आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर भाजप आजच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे आज गोव्यात शिंदे गटाची देखील सकाळी दहा वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. शिंदे गट आणि भाजप मिळून सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.