सागर पार्क प्रश्नावर महासभेत रंगणार चर्चा
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव शहर महानगरपालिकेची महासभा गुरुवार, दि. १४ मे रोजी सकाळी ११ वाजता महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाणारे अनेक विषय सभागृहात चर्चेसाठी येणार आहेत. क्रीडा, करमाफी, पर्यावरण संवर्धन, कर्मचारी प्रश्न आणि आर्थिक शिस्त यांसारख्या मुद्द्यांवर महासभेत सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.
महासभेच्या अजेंड्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे सागर पार्क मैदानावरील क्रिकेट स्पर्धा होय. मैदानावर स्पर्धांना परवानगी द्यायची की निर्बंध लावायचे, यावर सभागृहात मतमतांतरे होण्याची शक्यता आहे. शहरातील क्रिकेटपटू आणि क्रीडा संघटनांचे लक्ष या निर्णयाकडे लागले असून, सागर पार्क मैदानाचे भवितव्य काय ठरणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्याचा प्रस्तावही महासभेत मांडण्यात येणार आहे. विविध करांच्या थकबाकीवरील व्याजमाफीसंदर्भात प्रशासन सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.
मनपा कर्मचाऱ्यांशी संबंधित एनपीएस आणि डीसीपीएस योजनांबाबतचा विषयही सभेत चर्चेला येणार आहे. कर्मचारी संघटनांनी सातत्याने केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यासंदर्भात भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मेहरूण परिसरात बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्याचा प्रस्तावही महासभेच्या अजेंड्यावर आहे. जैवविविधतेचे संवर्धन, हरित क्षेत्रात वाढ आणि नागरिकांना पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि पुढील कार्यवाहीवर महासभेत निर्णय घेतला जाणार आहे.
याशिवाय मनपाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि निधी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्याचाही प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. निधी सुरक्षित ठेवणे, आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे आणि अनावश्यक खर्च कमी करणे या उद्देशाने प्रशासनाकडून पावले उचलली जाणार आहेत.
शहरातील विकासकामे, प्रशासकीय मंजुरी, कर्मचारी सेवा विषयक बाबी आणि इतर तांत्रिक विषयांवरही महासभेत चर्चा अपेक्षित आहे. विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांमुळे ही महासभा शहराच्या आगामी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, नागरिकांचे लक्ष आता सभागृहातील निर्णयांकडे लागले आहे.
