तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शासनाकडून तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या झोळीत सरकारने काय टाकले? अद्याप काहीच नाही. त्यामुळे शासन सुस्तावस्थेत आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. म्हणूनच अखिल भारतीय मराठा महासंघाने त्याची दखल घेत स्थानिक तहसीलदारांना गुरुवारी, १ फेब्रुवारी २०२४ रोजी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाने चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. शासनाने आपल्या परिपत्रात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने चालू वर्षाचे पीक कर्ज, कृषी पंपाच्या चालू बिलात पूर्णतः सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चालू वर्षाची शालेय फी व इतर कोणतीही फी तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई अनुदान मिळणे आवश्‍यक होते. परंतु चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होऊनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. हल्ली त्यांच्या पदरात फक्त अश्रू आहेत. अनेक राजकारणी भाषणात बोलतात जगाचा पोशिंदा शेतकरी राजा जगला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांच्या पदरात दुष्काळ जाहीर होऊनही काहीच पडले नाही. जाहीर केलेल्या सवलती मिळण्यासाठी तहसिलदारांनी शासनाकडे प्रयत्न करावे, शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई अनुदान मिळावे, तात्काळ दखल न घेतल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच मराठा महासंघाच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, तालुकाध्यक्ष ॲड.निळकंठ पाटील, शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, तालुकाध्यक्ष कैलास देशमुख, प्रा. चंद्रकांत ठाकरे, अनिल कोल्हे, बंडू बिडे, संजय बिडे, समर्थ भोसले, रामदास शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव शहराध्यक्ष सागर निकम, प्रतीक चव्हाण आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here