जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; ५० हून अधिक गावांच्या महसुली कामांना मिळणार गती, नगरपरिषदेकडून विनामूल्य जागा देण्याची तयारी
साईमत/नशिराबाद/ प्रतिनिधी :
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नशिराबाद शहराला पुन्हा एकदा प्रशासकीय महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी जळगाव तालुक्याचे प्रस्तावित ‘अप्पर तहसील कार्यालय’ नशिराबाद येथे सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सभापती पंकज शामकांत महाजन यांनी केली आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केले.
निवेदनात महाजन यांनी नशिराबादच्या ऐतिहासिक महत्त्वाचा विशेष उल्लेख केला आहे. ब्रिटिश काळात नशिराबाद हे ‘परगणा’ म्हणून ओळखले जात होते. त्या काळात येथे तहसील कार्यालय, न्यायालय तसेच फाशी देण्याची व्यवस्थाही अस्तित्वात होती. महसुली आणि व्यापारी व्यवहारांचे प्रमुख केंद्र म्हणून नशिराबादची संपूर्ण परिसरात ओळख होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर जळगाव तालुका आणि जिल्ह्याचा विस्तार वाढत गेल्याने प्रशासकीय केंद्रबिंदू जळगावकडे सरकला आणि नशिराबादचे महत्त्व कमी होत गेले.
सध्या जळगाव तालुक्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महसूल विभागावरील कामाचा ताणही प्रचंड वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या विविध महसुली कामांमध्ये विलंब होत असून सर्वसामान्यांना वारंवार जळगावला जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने २ एप्रिल २०२६ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करत जळगाव, जामनेर आणि चाळीसगाव तालुक्यांसाठी ‘अप्पर तहसील कार्यालय’ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर जळगाव तालुक्यासाठीचे अप्पर तहसील कार्यालय नशिराबाद येथे सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नशिराबाद शहर भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. उमाळा, देव्हारी, चिंचोली, धानवड, धानवड तांडा, कुसुंबे खुर्द, कढोली, रायपूर, मण्यारखेडा, बेळी, निमगाव, भागपूर, जळगाव खुर्द, तिघ्रे, खिर्डी, कडगाव, कानसवाडे, शेळगाव, देऊळवाडे, भोलाणे, सुजदे, भादली बुद्रुक, आसोदा, तरसोद, ममुराबाद, इदगाव, आवार, तुरखेडे, धामणगाव, खापरखेडा यांसह सुमारे ५० हून अधिक गावांतील नागरिकांना महसुली कामांसाठी नशिराबाद हे अधिक सोयीचे केंद्र ठरणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले आहे.
विशेष म्हणजे, प्रस्तावित कार्यालयासाठी जागेची कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आवश्यक प्रशासकीय जागा नशिराबाद नगरपरिषदेकडून विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनावर उपनगराध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांच्यासह राहुल चौधरी, रवींद्र संतोष चौधरी, मुरलीधर गोविंदा पवार, निवृत्ती कोळी, केशव संजय गोसावी, भूषण भाऊराव कोळी आणि संदीप विष्णू पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
