नागरिकांच्या हेलपाट्यांची दखल; महापौरांनी प्रशासनाला सुनावले खडे बोल
साईमत/जळगाव / प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन शिस्तीबाबत वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. कार्यालयीन वेळेत सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्यस्थळी उपस्थित राहून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करतील, याची खात्री करण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्येतील वाढ आणि नागरी सुविधांची वाढती मागणी यामुळे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र अनेकदा संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी महापौरांकडे मोठ्या प्रमाणात पोहोचल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर महापौरांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात प्रशासनातील शिस्त आणि कार्यक्षमता वाढविण्याची गरज अधोरेखित केली आहे. कार्यालयीन वेळेत काही कर्मचारी वैयक्तिक कामे, चहापान किंवा अन्य कारणांसाठी दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
महापौरांनी सर्व विभागप्रमुख आणि शाखा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यास सांगितले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कार्यालय सोडू नये, तसेच प्रत्येक नागरिकाला वेळेवर आणि समाधानकारक सेवा मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नागरिकाभिमुख प्रशासन उभारण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. महापालिकेतील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि जबाबदार बनविण्यासाठी उपस्थितीची शिस्त बंधनकारक करण्यात येत असून, यामुळे नागरिकांची प्रलंबित कामे जलदगतीने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
