साईमत लाईव्ह धानोरा प्रतिनिधी
सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी च्या नवरात्रोत्सवाला २६ सोमवार पासुन प्रारंभ झाला आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या महामारी नंतर प्रथमच सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
यासाठी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त मेहनत घेतांना दिसुन येत आहेत. २ ऑक्टो रविवार रोजी सप्तमी व ३ ऑक्टो.सोमवार रोजी अष्टमी असल्याकारणाने मनुदेवीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातुन लाखो भाविकांची उपस्थिती लाभणार असल्याचे भाकित वर्तविले जात आहे . यासाठी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या व यावल पोलिस स्टेशनच्यावतीने कडक बंदोबस्तही ठेवण्यात येणार असून नुकतीच २५ रविवार रोजी सकाळी ११ वा. मनुदेवी नवरात्रोत्सवात नियोजन व सोयी सुविधा करीता मनुदेवी मंदिराच्या सभागृहात यावल नायब तहसीलदार संतोष विनंते,यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने यावल पो.नि.राकेश मानगावकर , बस आगार सहाय्यक व्यवस्थापक जी.पी.जंजाळे , संदीप अडकमोल , वाहतूक नियंत्रक विकास करांडे , कमलाकर चौधरी , सांबाविचे सहाय्यक अभियंता केतन मोरे , वनविभागाचे सुनिल भिलावे, मनुदेवी संस्थाध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी , खजिनदार सोपान वाणी, विश्वस्त नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनिल महाजन, सरपंच आमिना रसीद तडवी, तलाठी आर.के.गोरटे , आदि उपस्थित होते.
मनुदेवी नवरात्रोत्सवात भाविकांना जाणे येण्यासाठी यावल आगारातुन २० ते २५ बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आगार प्रमुख जंजाळे यांनी दिली.
सोमवार घटस्थापने पासुन खाजगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाणार आहेत मात्र भाविकांची वाढती गर्दी पाहता ऐनवेळी मानापुरी जवळ असलेल्या संस्थानच्या जागेवर खाजगी वाहनांना पार्किंग करून तेथुन चार कि.मी . अंतर पार्किंगची जागेपासून पुढील प्रवास बसने करावा लागणार आहे. तसेच जिल्ह्यातील यावल चोपडा सह इतर आगारातुनही सोयी नुसार बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही समजते.नवरात्रोत्सावात नऊ दिवस यावल पोलिसस्टेशनच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.यासाठी मनु देवी मंदिरातील स्वयंसेवकही सहकार्य करणार आहेत.
ब-हाणपुर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुडा पर्वताच्या रांगेत १२ कि मी.अंतरावर खान्देश वासियांचे कुलदैवत मनुदेवी मातेचे हेमांडपंथी मंदिर आहे.मंदिराची स्थापना प्राचीन काळापासून करण्यात आली असून महामार्गावर असलेले चिंचोली गावापासून तीन कि.मी.अंतरावर उत्तरेला आडगाव कासारखेडा व तेथुन साधारणतः पाच ते सहा कि. मी. अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले मानापुरी या आदिवासी गावापासून मनुदेवीचे मंदिर जवळपास चार ते पाच कि.मी अंतरावर आहे , म्हणजे पाच कि.मी.संपुर्ण सातपुड्याच्या जंगलातुनच प्रवास करावा लागतो.मनुदेवी मंदिराकडे जाताना वाटेत मारोतीचे छोटे मंदिर आहे. मनुदेवी मातेचे दर्शन घेण्याआधी भाविक प्रथम येथुनच माथा टेकवून पुढे प्रवास करतात.
मंदिर परिसरात पोहचल्यावर जवळपास शंभर सव्वाशे पाय-या चढून मंदिरात जावे लागते.मंदिराच्या समोरच ९० ते १०० फुट उंचावरुन नयनरम्य असा धबधबा कोसळतो. श्रावण महिन्यात हा धबधब्याचा प्रवाह एवढ्या जोरदार सुरू असतो की मंदिराच्या पाय-या वर सुद्धा पाण्याचे फवारे येतात. श्रावण महिन्यात हा धबधबा पाहण्यासाठी शाळा कॉलेजचे विद्यार्थी मोठया प्रमाणावर गर्दी करतात.गेल्या आठवडाभर सातपुड्याच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने मनुदेवी मंदिरा समोरील धबधबा आजही नवरात्रोत्सवात सुरू आहे.
यात्रोत्सव:श्रावण महिन्यात पिठोरी अमावास्या झाल्यानंतर दुसर्या दिवशी , माघ महिन्यात , व आश्विन महिन्यात पहिल्या दिवसापासून नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रौत्सवात दहा दिवस लाखो भाविक व पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात .नवरात्रोत्सावात खणा नारळाची व खेळ खेळण्याची तसेच फराळाची मोठी दुकाने या ठिकाणी लावली जातात दहा दिवस लाखो रुपयांची उलाढाल याठिकाणी होत असते.
मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष शांताराम पाटील,उपाध्यक्ष शिवाजी पाटील , सचिव निळकंठ चौधरी , खजिनदार सोपान वाणी , विश्वस्त भास्कर पाटील , चिंधु महाजन , सतीश पाटील , सुनील महाजन , नितीन पाटील, भुषण चौधरी , योगेश पाटील ,चंदन वाणी , ज्ञानेश्वर पाटील आदि विश्वस्त सह मनुदेवी स्वयंसेवक,नवरात्र शांततेत पार पाडण्यासाठी मेहनत घेत आहेत.