अवैध उत्खनन चौकशी थांबवण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना नाशिक ACBची कारवाई; जिल्ह्यात खळबळ
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्ह्यात शासकीय यंत्रणांतील लाचखोरीवर नियंत्रण मिळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच PWD शाखा अभियंत्याला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका शासकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नशिराबाद येथील मंडळ अधिकारी मिलिंद प्रकाश देवरे यांच्याकडे अवैध उत्खननाच्या तक्रारीची चौकशी सोपविण्यात आली होती. ही चौकशी बंद करून तक्रारदाराला मदत करण्यासाठी त्यांनी थेट १ लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत नाशिक येथील ACB कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ५० हजार रुपयांवर तडजोड झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ACB पथकाने सापळा रचून कारवाईची आखणी केली.मंगळवारी नियोजित सापळ्यानुसार, आरोपी मंडळ अधिकारी देवरे याचा खाजगी पंटर सुरेंद्र अहिरे याने पिंप्राळा तलाठी कार्यालयासमोर ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या नाशिक ACB पथकाने दोघांना झडप घालून रंगेहात ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित अधिकारी शासकीय सेवेत असूनही मोठ्या वेतनावर कार्यरत असताना लाचखोरीच्या आरोपात अडकल्याने प्रशासकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून ACBकडून सातत्याने कारवाया सुरू असूनही लाचखोरीच्या घटनांमध्ये घट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आणि पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
