साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर
चोपडा तालुक्यातील धानोरा गावात जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल १६ कोटी रुपये खर्चुन पाण्याच्या टाकीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या महिन्यात काम पूर्ण होऊन ग्रामस्थांना येत्या दोन महिन्यात शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहेत. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईस आळा बसणार आहे. संपूर्ण गावात उच्च दर्जाची डीआय पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. येत्या दोन महिन्यात ग्रामस्थांना पाणी पिण्यास मिळण्याची शक्यता आहे. कामाची पाहणी स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच केली आहे.
धानोरा गावात सध्या चार-पाच दिवसाआड पाणी येते. ही परिस्थिती उन्हाळ्यात पंधरा दिवसांवर जात असते. तसेच कुपनलिका जळणे, पाण्याची पातळी खाली जाणे यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनली होती. त्याचे गांभीर्य माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी लक्षात घेऊन आ.लता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने गावात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून तब्बल पंधरा कोटी रुपये मंजुर केले. गावातील आठवडे बाजारात जुन्या पाण्याच्या टाकीजवळ नवीन जलकुंभ बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे. हे काम पूर्णत्वास जात आहे.
युद्धपातळीवर बांधकाम सुरु
बांधकाम होत असलेल्या पाण्याच्या टाकीची दोन लाख ४० हजार लिटरची क्षमता आहे. तापी नदीतून मितावली मार्गे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ जलशुद्धीकरण केंद्र बांधकाम होणार आहे. त्यातून गावातील पाण्याच्या टाकीतून संपूर्ण गावातील ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. कामावर पर्यवेक्षक चांगले लक्ष ठेवत असुन कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर बांधकाम सुरु आहे.