साईमत / नाशिक
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) कंपनीने प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देत मागील तीन महिन्यांत ५४ प्रवाशांना एकूण २६ हजार ८५७ रुपयांचा परतावा दिला आहे. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर तत्परतेने कार्यवाही करत प्रशासनाने प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.
दररोज हजारो नागरिक सिटीलिंक बससेवेचा लाभ घेत असताना काही वेळा ऑनलाइन तिकीट अथवा पास न मिळणे, बसफेरी रद्द होणे, बँक खात्यातून रक्कम वजा होऊनही तिकीट न मिळणे तसेच गर्दीच्या वेळी वाहकाकडून उर्वरित रक्कम परत मिळण्यास उशीर होणे अशा समस्या उद्भवतात.
मात्र अशा प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सिटीलिंक प्रशासनाने प्रवाशांना त्वरित परतावा देण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवली आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या परताव्यांमध्ये जानेवारी महिन्यात १४ प्रवाशांना ७ हजार ७२८ रुपये, फेब्रुवारी महिन्यात २४ प्रवाशांना १४ हजार ८२ रुपये आणि मार्च महिन्यात १६ प्रवाशांना ५ हजार ४७ रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या या पारदर्शक आणि प्रवासीहिताच्या भूमिकेमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. भविष्यातही दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी सिटीलिंक कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
