गोकुळ गीते मुंबईकडे रवाना शिवसेना प्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी
साईमत /नाशिक/ प्रतिनिधी :
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाले असून, महायुतीने जळगावसह बहुतांश जागांवर जोरदार यश मिळवले आहे. मात्र नाशिकमध्ये महायुतीचे आणि शिवसेना (शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना धक्का देत बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले आहेत. या अनपेक्षित निकालानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून गीते यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विजयी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून वरिष्ठ पातळीवर चर्चा पूर्णत्वाच्या टप्प्यात असल्याचे समजते.
या संपूर्ण रणनीतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या नेत्यांवर जबाबदारी सोपवली होती. त्यामध्ये पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटीलआणि जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांचा समावेश आहे.
आज दुपारी दोन्ही नेते नाशिकमध्ये दाखल होऊन नवनिर्वाचित विजयी उमेदवार गोकुळ गीते यांच्या निवासस्थानी पोहोचले. येथे काही वेळ महत्त्वपूर्ण चर्चा झाल्यानंतर तिघेही नाशिक विमानतळाकडे रवाना झाले.
त्यानंतर विशेष विमानाने गोकुळ गीते यांना घेऊन हे नेते मुंबईकडे रवाना झाले असून, आज संध्याकाळपर्यंत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गीते यांचा जाहीर शिवसेना प्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, नाशिकची जागा शिवसेनेच्या ताब्यात असूनही तेथे बंडखोरी झाल्याने अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला होता. या प्रकारामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, निवडणूक जिंकलेल्या उमेदवारालाच पक्षात सामावून घेत शिंदे गटाने राजकीय समीकरणे बदलण्याचा मोठा डाव साधला आहे.
या घडामोडींमुळे नाशिकची जागा तांत्रिकदृष्ट्या पुन्हा एकदा शिवसेनेकडे राहणार असल्याचे स्पष्ट होत असून, हा उपमुख्यमंत्री शिंदे यांचा राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ मानला जात आहे.
