साईमत न्यूज नेटवर्क –
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. तर नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. मुंबईत दुपारी ३ वाजल्यापासून मोठी भरती (हायटाईड) येण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. तसेच इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली जात असल्याने वारकऱ्यांनी थेट पुण्यात पोहोचावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्षातून संपूर्ण परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे.
मुंबईत दुपारी ३ वाजल्यापासून हायटाईड असल्याने पाणी साचण्याची शक्यता आहे. याशिवाय आजही ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. कालच्या जोरदार वाऱ्यामुळे सुमारे ३५० झाडे पडली. विशेष म्हणजे, महिनाभराचा पाऊस अवघ्या चार दिवसांत मुंबईत झाल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा
नाशिक जिल्ह्यासाठीही विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथे सुमारे ३०० मिमीपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ८ तारखेपर्यंत राज्यात हवामानाचा इशारा कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही अनावश्यक प्रवास टाळावेत आणि अत्यावश्यक गरज असल्यासच घराबाहेर पडावे.
