चोपडा तालुका प्रशासन पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी सज्ज

0
2

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील सर्व गावांमध्ये रविवारी, ३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी १९५ बूथ तसेच १९ मोबाईल टीम, बाजार, एसटी स्टँड व नाके याठिकाणी नऊ ट्रांजिट टीमद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम तालुक्यातील सर्व गाव, पाडे, दुर्गम भाग, शेत शिवार व वीटभट्टी अशा सर्व ठिकाणी राबविण्यात येणार आहे. मोहिमेत चोपडा तालुक्यातील ३१ हजार ८३९ शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, नगरपरिषद विभाग, स्थानिक स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या मदतीने नियोजन केले आहे.

मोहिमेचे सुसूत्रीकरण व समन्वय साधण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली तालुका टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला गटविकास अधिकारी रमेश वाघ, नायब तहसीलदार सचिन बांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय धनगर उपस्थित होते.

दक्षता घेण्याबाबत सूचना

बैठकीत तालुक्यातील सर्व बालकांना वयोगटानुसार पोलिओ लसीचे दोन थेंब पाजण्याकरीता दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या. तसेच सर्व पालकांनी आपल्या बालकांना घराजवळील पोलिओ बूथवर जाऊन पोलिओ लसीचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारपासून तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस तब्बल १८७ पथकाद्वारे घरोघरी भेट देऊन सुटलेल्या बालकांचे लसीकरण करून घेण्यासाठी नियोजन केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here