मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar)यांची भेट घेतली आहे. अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी कुठल्याही पूर्वनियोजित कार्यक्रमाविना ही भेट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यातच राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आलेले सरकार लवकरच कोसळेल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं भाकित शरद पवार यांनी वर्तविले आहे. यातच काल दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यावर रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार केला. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे. पवारांशी भेटीदरम्यान एकनाथ शिंदेंसोबत कोणताही बडा नेता उपस्थित नव्हता, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.