२ ते ३ टक्के भाडे आकारणीचा मुद्दा पेटला मनपावर आमदार भोळेंचा संताप
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव शहरातील गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित असलेला मुदत संपलेल्या गाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, यावरून राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळेधारकांना दिलासा देण्यासाठी २ ते ३ टक्के दराने भाडे आकारणीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असतानाही, जळगाव महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रस्तावात “नुकसानीचा” अनावश्यक मुद्दा समाविष्ट झाल्याने तो मूळ उद्देशापासून भरकटल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव येथील पद्मालय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीनंतर आमदार भोळे यांनी पत्रकार परिषद घेत मनपा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट आदेश, तरीही प्रस्तावात गोंधळ”
आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी सांगितले की, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे २ ते ३ टक्के दराने भाडे आकारणीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, जळगाव महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रस्तावात विनाकारण नुकसानीचा मुद्दा घालण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण प्रस्तावाचा मूळ हेतूच बदलला आहे.”
ते पुढे म्हणाले की, प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळेच हा प्रश्न इतकी वर्षे प्रलंबित राहिला आहे आणि गाळेधारकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे.
सुधारित प्रस्ताव तातडीने पाठवण्याचे आदेश
मनपा प्रशासनाच्या या त्रुटीवर बोट ठेवत आमदार भोळे यांनी उपायुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, जुन्या प्रस्तावातील सर्व त्रुटी दूर करून २ ते ३ टक्के भाडे आकारणीचा स्पष्ट आणि सुधारित प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा.
महासभेत अंतिम निर्णयाची मागणी
गाळेधारकांचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून तो अधिक काळ रेंगाळू नये, यासाठी हा विषय थेट महासभेत आणून अंतिम निर्णय घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. महासभेच्या माध्यमातून २ ते ३ टक्क्यांचा ठोस निर्णय घेतल्यास गाळेधारकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
गाळेधारकांचे लक्ष आता प्रशासनाच्या भूमिकेकडे
या संपूर्ण घडामोडींनंतर गाळेधारकांमध्ये पुन्हा एकदा आशा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता सुधारित प्रस्ताव कधी पाठवला जातो आणि शासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
