भारतामध्ये असे हायवे तयार होताहेत, ज्यावर चालता-चालता वाहने चार्ज होतील. या वृत्ताला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, सरकार सौरऊर्जेवर चालणारे विद्युत महामार्ग बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. या महामार्गांवर चालताना अवजड ट्रक आणि बसेसचे चार्ज होतील.
ही बातमी वाचताच तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील. उदाहरणार्थ- ई-हायवे काय आहेत? हे कसे काम करतात? त्यांचे फायदे काय आहेत? इत्यादी त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देत आहोत.
1: विद्युत महामार्ग किंवा इलेक्ट्रिक हायवे म्हणजे नेमके काय?
उत्तर: सामान्य महामार्ग किंवा द्रुतगती मार्ग हे पक्क्या रस्त्यांचे बनलेले असतात, ज्यावर सर्व प्रकारची वाहने धावू शकतात.
दुसरीकडे, विद्युत महामार्ग हे असे महामार्ग आहेत, ज्यामध्ये काही उपकरणांद्वारे अशी व्यवस्था केलेली असते, ज्याद्वारे त्यांच्यामधून जाणारी वाहने न थांबता त्यांच्या बॅटरी चार्ज करू शकतात. त्यासाठी महामार्गावर ओव्हरहेड वायरमधून किंवा रस्त्याच्या खालीच विद्युत प्रवाहाची व्यवस्था केली जाते.
इलेक्ट्रिक हायवे फक्त इलेक्ट्रिक वाहने चार्ज करू शकतात. यात पेट्रोल आणि डिझेल वाहने चार्ज होत नाहीत. यावर हायब्रीड वाहने देखील चार्हीज केल्या जाऊ शकतात. हायब्रीड वाहनांमध्ये इलेक्ट्रिक तसेच पेट्रोल-डिझेलवर चालण्याची सुविधा असते.
म्हणजेच, विद्युत महामार्ग हे विद्युत सुविधांनी सुसज्ज असे महामार्ग आहेत, जेथे त्यांच्यावरून जाणारी वाहने चार्ज केली जाऊ शकतात
2: इलेक्ट्रिक रस्त्यावर चालताना वाहने कशी चार्ज होतात?
उत्तर: इलेक्ट्रिक हायवेवर वाहने चार्ज करण्यासाठी दोन पद्धती वापरल्या जातात-
1. ओव्हरहेड पॉवर लाइनचा वापर करून, म्हणजे रस्त्याच्या वर बसवलेली इलेक्ट्रिक वायर.
2. रस्त्याच्या आतमध्ये विद्युत लाईन टाकून म्हणजे जमिनीच्या पातळीवरील (ग्राउंड लेव्हल पॉवर सप्लाय) वीज पुरवठ्याद्वारे.
1. ओव्हरहेड पॉवर लाईन: यामध्ये रस्त्यावर विद्युत तारा बसवल्या जातात. जेव्हा हायब्रीड किंवा इलेक्ट्रिक वाहने या तारांच्या खालून जातात तेव्हा वाहनांच्या वरचे पेंटोग्राफ या तारांच्या संपर्कात येतात. त्यामुळे तारेपासून त्या वाहनाकडे विद्युतप्रवाह सुरू होऊन त्याची बॅटरी चार्ज होते. जोपर्यंत वाहने या तारांच्या संपर्कात असतात, तोपर्यंत त्यांच्या बॅटरी चार्ज होत असतात.
दुसऱ्या बाजूला वळल्यानंतर किंवा वायरशी संपर्क तुटल्यानंतर, वाहन डिझेल किंवा पेट्रोल इंजिन मोडवर परत येते. म्हणजेच इलेक्ट्रिक बॅटरीऐवजी वाहन पेट्रोल-डिझेलवर चालू लागते.
या महामार्गांवरून केवळ इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड वाहनेच चार्ज होतात. हायब्रीड म्हणजे इलेक्ट्रिक आणि डिझेल-पेट्रोल या दोन्हीवर चालणारी वाहने होत.
इलेक्ट्रिक हायवेवर या तंत्रज्ञानाने फक्त अवजड ट्रक किंवा बसेस चार्ज करता येतात.
3: जगात सर्वात पहिले विद्युत महामार्गाचा वापर कोठे करण्यात आला?
उत्तर: 1990 ते 2010 दरम्यान, अनेक कंपन्यांनी विद्युत रस्ते बांधण्यासाठी प्रकल्पांवर काम केले.
- दक्षिण कोरियाने 2013 मध्ये गुमी शहरात बससाठी 7.5 किलोमीटर लांबीचा इलेक्ट्रिक मार्ग तयार केला. या रस्त्यावरून धावणाऱ्या बसेस वायरलेस चार्जिंग उपकरणे बसवून चार्ज करण्यात आल्या.
- 2015 मध्ये, दक्षिण कोरियाने सेजोंग शहरात बससाठी दुसरा विद्युत मार्ग तयार केला. 2016 मध्ये, कोरियाने गुमीमध्ये बससाठी आणखी दोन विद्युत मार्ग सुरू केले.
- कार, बस आणि ट्रकच्या बॅटरी चार्ज करण्यासाठी स्वीडनने 2018 मध्ये स्टॉकहोममध्ये जगातील पहिला विद्युतीकृत रस्ता तयार केला.
- 2019 मध्ये, जर्मनीने फ्रँकफर्ट शहराजवळ जगातील पहिला विद्युत महामार्ग उघडला, ज्यावर हायब्रीड ट्रक रिचार्ज केल्या जाऊ शकतात. सुमारे 10 किमी लांबीचा हा विद्युत रस्ता सीमेन्स मोबिलिटी कंपनीने तयार केला आहे.
- यूएस, यूके, जपान आणि फ्रान्स देखील इलेक्ट्रिक हायवे आणि इलेक्ट्रिक रस्ते बांधण्याचे काम करत आहेत.
- गेल्या अनेक वर्षांपासून भारतात विद्युत महामार्ग प्रकल्पाचे काम सुरू आहे. देशातील पहिला विद्युत महामार्ग 2023 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे 4: भारतात विद्युत महामार्ग कधी आणि कोठे सुरू होईल?
उत्तर: भारतात इलेक्ट्रिक हायवे बांधण्याची योजना 2016 मध्येच सुरू झाली. तेव्हा परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, लवकरच भारतातही स्वीडनसारखे इलेक्ट्रिक हायवे असतील.
भारताने जगातील सर्वात लांब विद्युत महामार्गाच्या बांधकामासाठी अटल ग्रीन इलेक्ट्रिसिटी नॅशनल हायवे म्हणजेच AHVRM नावाची योजना सुरू केली आहे. याअंतर्गत दिल्ली-जयपूर द्रुतगती मार्ग आणि दिल्ली-आग्रा यमुना द्रुतगती महामार्ग विद्युत महामार्ग बनवण्याचा पहिला प्रकल्प सुरू आहे.
यमुना एक्स्प्रेस वेवरील इलेक्ट्रिक हायवेची चाचणी डिसेंबर 2020 मध्ये झाली आहे. त्याच वेळी, दिल्ली-जयपूर महामार्गाला इलेक्ट्रिक हायवे बनवण्याची चाचणी 9 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे, जी महिनाभर चालेल.
दिल्ली-जयपूर महामार्ग आणि दिल्ली-आग्रा यमुना द्रुतगती महामार्गासह सुमारे 500 किमी विद्युत महामार्ग मार्च 2023 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. हा देशातील पहिला आणि जगातील सर्वात लांब विद्युत महामार्ग असेल. सध्या जगातील सर्वात लांब विद्युत महामार्ग बर्लिनमध्ये आहे, ज्याची लांबी 109 किमी आहे.
5: इलेक्ट्रिक हायवे बांधण्याचे काय फायदे आहेत?
उत्तर: इलेक्ट्रिक हायवेकडे दोन कारणांमुळे भविष्यातील बदल म्हणून पाहिले जात आहे. पहिले- यामुळे वाहनांना जीवाश्म मुक्त म्हणजे पेट्रोल आणि डिझेलशिवाय चालवता येईल. दुसरे- यामुळे वायू प्रदूषण शून्य होते. संपूर्ण जगासाठी प्रदूषण ही गंभीर समस्या आहे.
सीमेन्स कंपनीच्या दाव्यानुसार- ‘ट्रक वाहतूक असलेल्या सुमारे 30% महामार्गांचे विद्युतीकरण करायचे असेल तर ते दरवर्षी सुमारे 7 दशलक्ष टन कमी कार्बन डायऑक्साइड सोडेल. म्हणजेच वायू प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.
परिवहन मंत्रालयाच्या दाव्यानुसार, विद्युत महामार्ग बांधल्यामुळे दरवर्षी सुमारे 32 लाख कोटी लिटर पेट्रोल आणि डिझेलची बचत होईल. तसेच, यामुळे देशाचा लॉजिस्टिक खर्च दरवर्षी सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी कमी होईल.
परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणतात की, सरकार इलेक्ट्रिक हायवे बांधण्यासाठी 2.5 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वेगाने वाढेल, असा सरकारला विश्वास आहे.
देशातील 26 ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे तयार करण्याच्या सरकारच्या योजनेचा इलेक्ट्रिक महामार्ग हा एक भाग आहे. गडकरी म्हणाले की, ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे अंतर्गत देशभरातील महामार्गांजवळ सुमारे 30 दशलक्ष झाडे लावण्याची सरकारची योजना आहे.
.