साईमत न्यूज नेटवर्क –
लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या मॅजिक वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी सुमारे ७.३० वाजता पीलीभीत-बस्ती महामार्गवरील अदलीसपूर गावाजवळ घडला. मॅजिक वाहनात २ महिलांसह एकूण १० जण प्रवास करत होते. ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने मॅजिक वाहन तब्बल १० फूट अंतरापर्यंत फरफटत गेले आणि क्षणार्धात मोठा अपघात झाला.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अनेक जण सीटमध्ये अडकले, तर काही प्रवासी धडकेमुळे रस्त्यावर फेकले गेले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. एक गंभीर जखमी रुग्णालयात नेत असताना त्याचाही मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा १० वर पोहोचला.
प्राथमिक माहितीनुसार, मॅजिक वाहन लखीमपूर येथून सिसैया दिशेने जात होते, तर ट्रक बहराइचकडून येत होता. ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे आणि चालकाचा शोध सुरू आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.
