साईमत, जळगाव : प्रतिनिधी
संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या व सर्वांनाच उत्सुकता लावणाऱ्या भारताने चंद्रावर पाठविलेल्या ‘चांद्रयान-३’ चे बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मीनिटांनी लँडिंग झाले. ही एक ऐतिहासिक गोष्ट असल्यामुळे त्यांचा सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभव घ्यावा या उद्दिष्टाने प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव व विज्ञान लॅब असिस्टंट विजय चव्हाण यांनी हुबेहूब ‘चांद्रयान-३’ची प्रतिकृती बनविली. शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाचे महत्व तसेच लाईव्ह प्रसारित होणाऱ्या ‘चांद्रयान-३’च्या लँडिंगला नक्कीच बघावे, याविषयी मार्गदर्शन केले.
चंद्रावर जात असलेले हे भारतीय अंतराळ संशोधन यान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. याठिकाणी आतापर्यंत कुठलेही यान पोहोचलेले नाही, असे सांगितल्याची माहिती आहे. म्हणून संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ या करीता ‘चांद्रयान-३’ मोहीम अत्यंत महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे. ‘चांद्रयान-२’ नंतर भारताचा दुसरा प्रयत्न असणार आहे. परंतु आपल्या देशातील तंत्रज्ञान किती प्रमाणात विकसित आहे हे दाखविण्याची संधी भारताला मिळालेली आहे. या संधीचे सोने करीत विद्यार्थ्यांमध्येही वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच देशप्रेम हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावे असा प्रयत्न शाळेचा असणार आहे.
‘चांद्रयान-३’ भारताची महत्वाची मोहीम
विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी ‘चांद्रयान-३’ ही भारताची एक महत्वाची मोहीम आहे, असे मत व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबवायचा असेल तर त्यांना अशा उपक्रमातून शिकविणे गरजेचे आहे, असे सांगितले. संस्थेचे सचिव सचिन दुनाखे यांनी ‘चांद्रयान-३’ ला यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थना करत शेवटी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक सांगिता गोहील, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी, पालक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.