पहुरमधील साखळी उपोषण तहसिलदारांच्या लेखी पत्रानंतर मागे

0
1

साईमत, पहूर, ता.जामनेर : वार्ताहर

पहुर पेठ येथील वाघूर नदीच्या तीरावर श्री क्षेत्र केवडेश्‍वर महादेव मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी वाघूर विकास आघाडीतर्फे मंगळवारी, १८ जूनपासून सुरू असलेले साखळी उपोषण बुधवारी, १९ जूनला निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आले. याप्रकरणी येत्या २८ जून रोजी अंतीम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पहूर पेठ येथील हिंदू स्मशानभूमीजवळ होत असलेले अतिक्रमण काढण्यात यावे, यासंदर्भातत वाघूर विकास आघाडीतर्फे सुकलाल बारी, सहकाऱ्यांनी तहसिलदारांकडे अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. अतिक्रमण न काढल्यास साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू होते. याप्रकरणी अतिक्रमणधारक तजमुलखा अजीज पठाण भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालय जामनेर येथे सुनावणी सुरू आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय येत्या शुक्रवारी, २८ जून रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाचा खुलासा प्राप्त होताच त्वरित अतिक्रमण काढण्याविषयी न्यायोचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नानासाहेब आगळे यांनी दिल्याने संबंधित साखळी उपोषण मागे घेण्यात आले.

यांची होती उपस्थिती

उपोषणस्थळी बुधवारी सायंकाळी ५ वाजता निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, पोलीस निरीक्षक सचिन सानप, मंडळ अधिकारी श्रीमती मृणाल उंबरकर, तलाठी प्रमोद इंगळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, सुधाकर शिंनगारे, ज्ञानेश्‍वर घोलप, रवींद्र पांढरे, ग्रामस्थ, पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here