गरिबीवर मात करत शाईस्ताची महाराष्ट्र पोलीस दलात निवड
साईमत पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी :
अठरा विश्व दारिद्र्य, उपासमारीची तीव्र झळ, वीटभट्टीवर राबणारे आई-वडील आणि घरातील सततचा संघर्ष… अशा कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शाईस्ता दादाराव तडवी हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवत यशाचा नवा इतिहास रचला आहे. तिच्या या यशामुळे हिवरखेडा गावात अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळाला आहे.
सात बहिणींनंतर जन्मलेला भाऊ आणि आर्थिक चणचण या सर्व संकटांनी तिच्या स्वप्नांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आई-वडिलांनी मुलींच्या शिक्षणावर कधीही तडजोड केली नाही. “माझी मुलगी पोलीसच होणार” हा दृढ विश्वास त्यांनी मनात जपला आणि शाईस्तानेही त्या विश्वासाला सार्थ ठरवत कठोर परिश्रमाची साथ सोडली नाही.
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगत शाईस्ता रोज रानवाटांवर धावण्याचा सराव करत होती. अभ्यासातही ती तितकीच हुशार राहिली. सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने पहिल्याच प्रयत्नात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात निवड मिळवत यशाचे दार उघडले.
हिवरखेडा गावासाठी हा क्षण ऐतिहासिक ठरला असून गावातील पहिली महिला पोलीस म्हणून शाईस्ताने नवा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या यशाची बातमी गावभर पसरताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाश्रू दाटून आले.
शाईस्ता ही पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिने २०२३ मध्ये दहावी उत्तीर्ण केली. त्यानंतर बारावी विज्ञान शाखा पूर्ण करून इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू ठेवत पोलीस भरतीची तयारीही ती अखंडपणे करत होती. दिवस-रात्र घेतलेली मेहनत अखेर फळाला आली.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, क्रीडा विभाग प्रमुख हरीभाऊ राऊत, भगवान जाधव तसेच शिक्षकांनी तिच्या घरी भेट देऊन सन्मान केला. स्नेहवस्त्र, गुलाबपुष्प आणि पेढा भरवून तिचा व तिच्या आई-वडिलांचा गौरव करण्यात आला.
शाईस्ताची ही यशोगाथा केवळ एक बातमी नाही, तर प्रत्येक संघर्ष करणाऱ्या तरुणींसाठी प्रेरणादायी संदेश आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येयावर ठाम राहून मेहनत केली, तर यश निश्चित मिळते—हे शाईस्ताने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
गुलालाची उधळण; गावातून भव्य मिरवणूक
शाईस्ता तडवीच्या यशानंतर गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी गुलालाची उधळण करत तिची भव्य मिरवणूक काढली. आपल्या लेकीच्या यशाचा अभिमान पाहताना आई-वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले आणि संपूर्ण गावाने तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
