करिश्मा नायर यांची अचानक पाहणी रावेर तालुक्यात प्रशासन हादरले
साईमत/ रावेर / प्रतिनिधी
जळगाव जिल्हा परिषदच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी पदभार स्वीकारताच प्रशासकीय कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मंगळवार, ५ मे रोजी त्यांनी रावेर तालुक्यात अचानक धावता दौरा करत विविध शासकीय कार्यालयांची सखोल पाहणी केली. त्यांच्या या ‘सरप्राईज व्हिजिट’मुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली.
पंचायत समितीपासून ग्रामपंचायतीपर्यंत तपासणीचा धडाका
दौऱ्याची सुरुवात रावेर पंचायत समितीपासून करण्यात आली. येथे त्यांनी प्रलंबित फाईल्स, आस्थापना विषय आणि दैनंदिन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. कामकाजातील दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत त्यांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत कामात गती आणण्याचे निर्देश दिले.यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देत जनावरांच्या उपचार व्यवस्थेची पाहणी केली. सेवेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट करत दर्जेदार सेवा देण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
आरोग्य सेवांवर विशेष लक्ष
ऐनपूर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रालाही त्यांनी भेट दिली. आरोग्य केंद्रातील औषधसाठा, रुग्णसेवा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा यांची त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम असणे ही प्राथमिकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सोलर प्रकल्पाचे कौतुक
ऐनपूर येथील पर्यावरणपूरक सोलर प्रकल्पाची पाहणी करताना त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अशा हरित ऊर्जा प्रकल्पांना जिल्ह्यात अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.
प्रशासनाला स्पष्ट संदेश
या दौऱ्यादरम्यान बोलताना करिश्मा नायर यांनी सांगितले की, “प्रशासकीय पारदर्शकता आणि सर्वसामान्यांची कामे वेळेवर होणे ही आमची प्राथमिकता आहे. या भेटी केवळ पाहणीसाठी नसून कामकाजात गुणवत्ता आणण्यासाठी आहेत.”
यंत्रणेत ‘धावपळ’, अधिकाऱ्यांमध्ये सतर्कता
या अचानक दौऱ्यामुळे रावेर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये मोठी धावपळ उडाली. कामकाजात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनात शिस्त आणण्याचा स्पष्ट संदेश या दौऱ्यातून गेला आहे. जिल्हा परिषद प्रशासन आता अधिक सक्रिय आणि परिणामकारक होणार असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू झाली आहे.
करिश्मा नायर यांच्या या आक्रमक आणि शिस्तप्रिय कार्यशैलीमुळे आगामी काळात जिल्हा परिषदेत मोठे प्रशासकीय बदल अपेक्षित असल्याचे चित्र दिसत आहे.
