पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार गोदाम कर्मचारी व होमगार्डकडून वृक्षारोपण
साईमत /रावेर /प्रतिनिधी
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश देत रावेर येथील शासकीय धान्य गोदामातील अधिकारी, कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी संयुक्तपणे हरित उपक्रम राबविला. भारखेडा रस्त्यावरील शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि घटत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता वृक्ष लागवडीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गोदाम परिसरात वड, पिंपळ यांसारख्या सावली देणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच भविष्यात पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे.
या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दीपा जेधे आणि पुरवठा निरीक्षक डाळिंबी सरोदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी वृक्ष हे निसर्गाचे अमूल्य देणे असून, त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. केवळ वृक्ष लागवड न करता त्यांचे संगोपन करण्यावरही भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास गोदाम व्यवस्थापक शंकर गावडे, गोदाम लिपिक धर्मेंद्र चौधरी, सावदा येथील गोदाम व्यवस्थापक तथा लिपिक हर्षल पाटील, दीपक नगरे, प्रकाश पाटील तसेच गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक कांतीलाल तायडे यांची उपस्थिती होती.
वृक्षारोपण उपक्रमासाठी गोदाम कर्मचारी फिरोझ खान, स्वरूप महाजन, गणेश पाटील, विजय महाजन, अब्दुल खान, गोलू मोरे आणि होमगार्ड दिनेश महाजन यांनी विशेष सहकार्य केले.
शासकीय परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. भविष्यातही परिसरातील हिरवाई वाढविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
