गणेशोत्सव, ईद, नवरात्री उत्सव शांततेत साजरा करा

0
4

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

शहरात मंगळवारी, १९ सप्टेंबरपासून सुरू होणारे गणेशोत्सव, ईद, नवरात्री उत्सव हे सण सर्वांनी शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर येथील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यावतीने तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व समावेशक समाज बांधवांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. बैठकीला तालुक्यासह शहरातील गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मुस्लीम बांधव, राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शासनाच्यावतीने पाचोरा विभागाचे डी.वाय.एस.पी. धनंजय येरुळे, तहसीलदार नानासाहेब आगळे, जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, जामनेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक चंद्रकांत भोसले, गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनोज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, माजी उपनराध्यक्ष युनूस शेख, नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष नाना बाविस्कर, नगरसेवक उल्हास पाटील, खलील भांजा, रवींद्र झाल्टे, दीपक महाराज, कैलास पालवे, संजय सूर्यवंशी, यांच्यासह शहरातील तरुण मित्र मंडळाचे प्रतिनिधी, जामनेर मंडळाधिकारी विजय पाटील, जामनेर तलाठी कार्यालयाचे प्रतिनिधी, जामनेर नगरपालिकेचे कर्मचारी, महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुकीत धार्मिक संगीत वाजविण्याचे आवाहन

शासनाच्यावतीने तहसीलदार नानासाहेब आगळे, डी.वाय.एस.पी.धनंजय येरूळे, जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पहूरचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. उपस्थित मंडळांच्या प्रतिनिधींकडून उत्सवानिमित्त येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहरातील रस्त्यांबाबत व महावितरणाबाबत समस्या गणपती मित्र मंडळातून व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींकडून मांडण्यात आल्या. त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन शासनाच्यावतीने देण्यात आले. तसेच उपस्थित मुस्लीम बांधवांकडून गणपती विसर्जन मिरवणुकीत अश्लिल वाद्य न वाजविता धार्मिक संगीत वाजविण्याचे आवाहन करण्यात आले. एकंदरीत सर्व समावेशक समाज बांधवांनी होऊ घातलेले सर्व सण मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्याचे आवाहन शासनाच्यावतीने समाज बांधवांना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here