साईमत / कोल्हापूर
अंत्यसंस्काराच्या गडबडीचा फायदा घेत चोरट्याने घरातील तब्बल 16 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी मंडई परिसरात घडली आहे.
लक्ष्मीपुरी मंडईतील तीन मजली इमारतीत राहणाऱ्या हमीदा अब्दुलमजीद खाटिक (वय 70) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यानंतर बुधवारी कुटुंबीय तळमजल्यावर अंत्यसंस्काराची तयारी करत असताना वरच्या मजल्यावर घरफोडी करण्यात आली.
नातेवाईक व पाहुण्यांच्या गर्दीचा फायदा घेत चोरटा वरच्या मजल्यावर गेला आणि लाकडी कपाट फोडून 16 तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे अलंकार चोरून नेले. काही वेळाने कुटुंबीय खोलीत गेले असता घरातील साहित्य विस्कळीत अवस्थेत आढळून आले आणि चोरीचा प्रकार उघड झाला.
या घटनेमुळे कुटुंबीयांना दुहेरी धक्का बसला आहे. तात्काळ लक्ष्मीपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित तरुण इमारतीच्या मागून बाहेर जाताना दिसून आला आहे.
पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले असून श्वानपथकाचाही वापर करण्यात आला. मात्र श्वानपथक परिसरातच घुटमळल्याने तपास अधिक क्लिष्ट झाला आहे.
प्राथमिक तपासात घरातील किंवा नातेवाईकांची माहिती असलेल्या व्यक्तीचा सहभाग असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
