मिरा रोड येथे मेट्रो मार्गिकेच्या सुरू असलेल्या कामादरम्यान उंचावरून मोठा दगड रस्त्यावर कोसळून त्याचे तुकडे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आदळल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. वाहनात अनेक विद्यार्थी असतानाही सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेमुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिरा-भाईंदर शहरातील प्रमुख मार्गावर दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. विविध ठिकाणी मेट्रो मार्गिका तसेच स्थानकांच्या उभारणीची कामे सुरू असून, या परिसरातून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि नागरिकांची ये-जा सुरू असते.
सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दीपक हॉस्पिटलजवळ उभारण्यात येत असलेल्या नानासाहेब धर्माधिकारी मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी अचानक उंचावरून मोठा दगड खाली रस्त्यावर कोसळला. त्यावेळी रस्त्यावर वाहतूक सुरू होती. याच दरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन तेथून जात असताना दगडाचे तुकडे थेट वाहनावर आदळले.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे वाहनचालकाचा काही काळ ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन थांबले. या घटनेनंतर वाहनाच्या मागील चाकाची हवाही निघाली. वाहनात अनेक विद्यार्थी असल्याने काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मेट्रोच्या कामादरम्यान निष्काळजीपणामुळे यापूर्वीही दुर्घटना घडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप होत आहे.
मेट्रोचे काम शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याची असणे आवश्यक आहे. मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना उंचावरून दगड, लोखंडी साहित्य अथवा बांधकामाचे अन्य साहित्य खाली कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा जाळ्या, संरक्षक आवरण, मजबूत अडथळे तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या वाहनावर दगडाचे तुकडे आदळूनही मोठी दुर्घटना टळल्याने प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
