कृषी उपअधिकारी व दोन पंटरांवर गुन्हा
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी
शासनाच्या कृषी योजनेतील अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्याकडून लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. जोगे वडगाव येथील शेतकऱ्याकडून सहा हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारण्याचा कट रचल्याप्रकरणी पाचोरा कृषी कार्यालयातील कृषी उप अधिकारी लिलाधर देशमुख यांच्यासह दोन खाजगी पंटरांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मूळ तक्रारदार हे जोगेवडगाव, ता. पाचोरा येथील रहिवासी असून शेती व्यवसायासाठी लागणारे साहित्य शासनाच्या योजनेतून मिळणाऱ्या सबसिडीअंतर्गत खरेदी करण्यासाठी त्यांनी पाचोरा कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला होता. अर्जास मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी नांगर व रोटर खरेदी केली. यानंतर सदर साहित्याचे फोटो काढून ते योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करून अनुदान मिळवून देण्याच्या प्रक्रियेसाठी कृषी उप अधिकारी लिलाधर देशमुख यांनी तक्रारदाराकडे सहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे आरोप आहेत. ही रक्कम आंबेवडगाव (ता. पाचोरा) येथील धनदाई कृषी केंद्राचे संजय पाटील यांच्याकडे देण्यास सांगितल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने २ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, देशमुख यांनी अनुदानासाठी आवश्यक फोटो अपलोड करून देण्याच्या मोबदल्यात सहा हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारण्याचे ठरवून ती रक्कम संजय पाटील यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले.
देशमुख यांच्या सूचनेनुसार तक्रारदार हे पाच हजार रुपये देण्यासाठी धनदाई कृषी केंद्रावर गेले असता संजय पाटील दुकानावर उपस्थित नव्हते. त्या वेळी दुकानावर हजर असलेले नितीन निकम यांनी लाचेची रक्कम असल्याची जाणीव असूनही पंचासमक्ष ती स्वीकारल्याचे समोर आले. त्यामुळे कृषी उप अधिकारी लिलाधर देशमुख, खाजगी पंटर संजय पाटील व नितीन निकम या तिघांविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या कारवाईमुळे कृषी विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, शेतकऱ्यांना अनुदानाच्या नावाखाली लुटणाऱ्या प्रवृत्तींवर कडक कारवाईची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
