१०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात कारवाई
साईमत/जळगाव / प्रतिनिधी
राज्य शासनाच्या कामगार विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेत लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत एका महिला कर्मचाऱ्याला रंगेहात अटक केली आहे.
भाग्यश्री विजय पाटील असे अटक करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. योजनेचा लाभ देण्यासाठी १०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने ३ जून २०२६ रोजी संबंधित कल्याणकारी मंडळाच्या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानंतर ४ जून रोजी आवश्यक साहित्य संच घेण्यासाठी ते वितरण केंद्रावर गेले असता, तेथे कार्यरत असलेल्या भाग्यश्री पाटील यांनी संच मिळण्यासाठी लागणाऱ्या फॉर्मसाठी १०० रुपयांची मागणी केली. विशेष म्हणजे ही सेवा पूर्णतः मोफत असतानाही पैशांची मागणी करण्यात आली.
यामुळे तक्रारदाराने तात्काळ जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
ठरलेल्या नियोजनानुसार कारवाई करताना, लाचेची रक्कम स्वीकारताच भाग्यश्री पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. घटनास्थळावरून १३,६७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच परिसरातील स्टीलच्या डब्यातून आणखी १३,१०० रुपये रोख रक्कम आढळून आली. यामुळे एकूण २६,७७० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोहेकॉ बाळू मराठे आणि पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली.
दरम्यान, शासकीय योजनांचा लाभ देताना लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
