अवजड वाहनांच्या बेफाम वेगाला लगाम कधी? ट्रेलरच्या धडकेत २१ वर्षीय तरुण ठार एका दिवसात दोन बळी; महामार्ग सुरक्षेवर नागरिकांचा संताप
साईमत /नाशिराबाद / प्रतिनिधी
जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, महामार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. नाशिराबाद टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एकाच दिवशी महामार्गावर दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिराबाद टोलनाक्याच्या परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पिकअपमधील सोनू रामा बागले (वय २१, रा. भवानी नगर, नाशिराबाद) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघातातील तरुणाचा जीव वाचवता आला नाही. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
जळगाव राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवजड वाहनांचा वेग, वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे वारंवार अपघात होत असल्याची नागरिकांची भावना आहे. एकाच दिवशी दोन अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महामार्गावर धावणाऱ्या अवजड वाहनांच्या वेगावर कठोर नियंत्रण ठेवावे, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
