नदीपात्रातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना; तीन तासांच्या शोधानंतर मृतदेह हाती, एक बैलही दगावला
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
रोजच्या उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडलेल्या एका कष्टकरी शेतकऱ्यावर नियतीने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी घडली. गिरणा नदीच्या पात्रातून बैलगाडीने जात असताना खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी उलटली आणि त्यात वडनगरी येथील ५५ वर्षीय शेतकरी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. या दुर्दैवी घटनेमुळे वडनगरी परिसरात शोककळा पसरली आहे.
वडनगरी येथील दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय ५५) हे आपल्या सहकारी चिंतामण नाईक यांच्यासह रोजप्रमाणे खेडी भोकर शिवारातील सरपंच दत्तू रामचंद्र पाटील यांच्या शेतात मजुरीसाठी निघाले होते. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांची बैलगाडी गिरणा नदीच्या पात्रातून जात असताना अचानक खोल खड्ड्यात गेल्याने गाडीचा तोल गेला आणि बैलगाडी पाण्यात उलटली.
घटना घडताच चिंतामण नाईक यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ गाडीतून बाहेर उडी घेतली. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र, दिलीप कल्याणकर यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. खोल पाण्यात ते वाहून जात बुडाले. या घटनेत बैलगाडीतील एका बैलाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दुसरा बैल बचावला.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दिलीप कल्याणकर यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. मृतदेह हाती लागताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
मृत दिलीप कल्याणकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण वडनगरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
