यावल तालुका शेतकरी सहकारी संघातील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयावर भाजपाचा ताबा

0
2

साईमत, यावल : प्रतिनिधी

गेल्या साडेतीन दशकापासून यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ हा संचालक मंडळाच्या माध्यमातून भा.रा.काँ.च्या ताब्यात होता. गेल्या २० वर्षात संचालक मंडळात काँग्रेसचे वर्चस्व असल्याने याठिकाणी भा.रा.काँ.चे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या माध्यमातून तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे कार्यालय, सभागृह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी तसेच विविध कार्यक्रमासाठी संपर्क कार्यालय झालेले होते. परंतु नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ पैकी १६ जागांवर भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजितदादा गट), रिपाई (आठवले गट) पुरस्कृत सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहेे. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संपर्क कार्यालयावर ५ फेबु्रवारी २०२४ पासून भाजपाने लोकशाही मार्गाने ताबा मिळविल्याचे संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात चर्चिले जात असले तरी आता मात्र भारतीय जनता पार्टी आपल्या सत्ताधारी नेते मंडळीच्या माध्यमातून यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या उत्पन्न वाढीसाठी नवीन नियोजन काय करणार..? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

यावल तालुका जिनिंग प्रेस म्हणजे यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ १९५८ पासून कार्यरत आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी जिनिंग प्रेसचा व्यवसाय आर्थिक धोक्यात आल्याने २००७ मध्ये तत्कालीन व्यवस्थापक अभिमन्यू बडगुजर सेवानिवृत्त झाले. त्यावेळेस संघ ५१ लाख रुपयांच्या तोट्यात आणि ५८ लाख कर्ज देण्याच्या आर्थिक संकटात होते. त्यानंतर यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातील संचालक मंडळ व व्यवस्थापकांनी आर्थिक नियोजन करून ५१ लाखांचा तोटा भरून काढला. परंतु संस्थेचा आजपर्यंतचा ६० वर्षाचा कालावधी झाल्याने संस्थेला आता फक्त व्यापारी संकुलनातून दरमहा ६० हजार रुपये गोडाऊन भाड्यातून २० ते २२ हजार रुपये असे ११ ते १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. त्यापैकी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रशासकीय खर्च असा ८ ते ९ लाख रुपये खर्च होत असतो. अशा प्रकारची आर्थिक स्थिती असताना मात्र शेतकरी संघाने बँकांमध्ये ८५ लाख रुपये डिपॉझिट केली आहे.

८५ लाख रुपये अल्प प्रमाणात डिपॉझिट असली तरी शेतकरी सहकारी संघाचे वार्षिक उत्पन्न वाढीसाठी सर्वात प्रथम जिनिंग प्रेस आवारातील गोडाऊन दुरुस्ती रिपेअर केल्यास आज रिकामी असलेले गोडाऊन भाड्याने देता येतील आणि त्यातून आर्थिक उत्पन्न वाढेल. तसेच जिनिंग प्रेस सोसायटीने भरड धान्यासाठी महसूल विभागाला म्हणजे शासनाला गोडाऊन भाड्याने दिले होते. त्यापोटी शासनाकडे २५ लाख रुपये बाकी घेणे आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याने २५ लाख रुपये वसूल होण्यासाठी भाजप आज सत्ताधारी गटात असल्याने आपल्या वरिष्ठ नेते मंडळीच्या माध्यमातून शेतकरी संघाला २५ लाख रुपये मिळाले तर काहीतरी मोठी उलाढाल करता येईल.

अभ्यास दौऱ्यातून संचालकांनी काय अभ्यास अन्‌ प्रयत्न केले?

गेल्या पाच वर्षात यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या काही संचालकांनी संघाच्या आर्थिक नियोजन आणि तरतुदी आणि नियमानुसार दोन वेळा अभ्यास दौरे काढले होते. अभ्यास दौरे करतांना संचालकांनी कोणत्या ठिकाणी कोणत्या सहकार क्षेत्राला भेटी देऊन काय अभ्यास दौरा केला आणि त्याबाबत यावल तालुका शेतकरी संघात संघाचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी काय नियोजन केले. फक्त वैयक्तिक फिरस्ती, मौज मस्ती केली आणि शेतकी संघात अभ्यास दौऱ्याबाबत काय नोंदी झाल्या. याबाबत संपूर्ण यावल तालुक्यात अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. अभ्यास दौरे करताना कोल्हापूर, बारामती, अहमदनगर, संगमनेर व इतर सहकारी संस्थांप्रमाणे जनरेटिक मेडिकल स्टोअर्स, पेट्रोल पंप, गोडाऊन बांधकाम, आडत व्यवहार, मल्टीपर्पज व्यवहार, कृषी अवजारे व्यवसाय आदी व्यवसायाचे नियोजन किंवा शासन दरबारी मागणी अभ्यास दौऱ्यामुळे केली आहे का? किंवा अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातून आर्थिक खर्च करून इतर ठिकाणचा वैयक्तिक पर्यटनस्थळ पाहणी केली गेली का? याबाबत अभ्यास दौऱ्याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. संस्थेचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी अभ्यास दौऱ्यातून काय प्रयत्न झाले? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

बाटली तीच ‘लेबल’ बदलले

यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा तसेच तालुक्यातील सहकार विभागाचा आढावा घेतल्यावर गेल्या २० ते २५ वर्षाच्या कालावधीत सहकार क्षेत्रात म्हणजे जे.टी.महाजन सहकारी सूतगिरणी, जिनिंग प्रेस सोसायटी, फ्रुट सेल सोसायटी, मधुकर सहकारी साखर कारखाना, इंजिनिअरिंग कॉलेज, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी पतसंस्था व इतर सहकार क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संचालक मंडळात प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते, संचालक म्हणून सोबत होते. तालुक्यातील ५० टक्के सहकार क्षेत्राचे आज बारा कसे आणि कोणामुळे वाजले..? सुत गिरणी, मधुकर कारखाना हे मोठे उद्योग कोणाच्या राजकारणामुळे आणि कोण गप्प बसल्यामुळे बंद पडले. हे आज सर्व राजकारणाला आत्मचिंतन करण्यासारखे आहे. त्या वेळेला विरोधक गप्प का होते? असा महत्त्वाचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

भाजपकडे खरोखरच भक्कम उमेदवार होते का?

यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात भाजपा पुरस्कृत सहकार पॅनलने १७ पैकी १६ जागांवर जो दणदणीत विजय मिळविला. त्यात काही संचालक हे वैयक्तिक भक्कम आणि आधी ते भा.रा.काँग्रेसमध्ये असल्याने ते भाजपचे कट्टर समर्थक पदाधिकारी होते आणि आहेत का? असा अर्थ निघत नाही. सहकारात राजकारण नसते असे राजकारणातच चर्चिले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here