मोबाईल कॉल ठरला घातक? तरुणाची गोळी झाडून आत्महत्या
साईमत भडगाव प्रतिनिधी
शहरातील खुशाल आप्पा नगर परिसरात रविवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, २२ वर्षीय तरुणाने गावठी पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्वप्निल प्रवीण शिंपी असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा सकाळपासून नेहमीप्रमाणे कुटुंबीय व मित्रांसोबत वावरत होता. कोणत्याही प्रकारची अस्वस्थता त्याच्या वागण्यात जाणवत नव्हती. मात्र दुपारच्या सुमारास त्याला एक संशयास्पद फोन आला. या फोननंतर तो अचानक चिंताग्रस्त झाला आणि कोणालाही काहीही न सांगता घरातील आपल्या खोलीत गेला. त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला.
काही क्षणांतच खोलीतून गोळीबाराचा मोठा आवाज ऐकू आल्याने कुटुंबीयांनी घाबरून धाव घेतली. खिडकीतून पाहिले असता स्वप्निल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. नातेवाईकांनी तातडीने दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले आणि भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्तूल तसेच स्वप्निलचा मोबाईल फोन जप्त केला आहे. संबंधित फोन कॉल नेमका कोणाचा होता आणि त्यानंतर स्वप्निल एवढा अस्वस्थ का झाला, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सध्या पोलिसांकडून मोबाईलचे लॉक उघडण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून या आत्महत्येमागील कारणांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भडगाव पोलीस करत आहेत.
