बेस्टच्या १८ दिवसांच्या मोहिमेत २३ चालकांवर कारवाई
साईमत /मुंबई /प्रतिनिधी
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बेस्ट उपक्रमाने कंत्राटी बस चालकांविरोधात धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या चालकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, अवघ्या १८ दिवसांत २३ कंत्राटी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या चालकांवर यापुढे अधिक कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या बेस्टच्या ताफ्यात सध्या सुमारे अडीच हजार कंत्राटी बस धावत आहेत. मात्र, काही चालकांकडून बस चालवताना मोबाईलवर बोलणे, हेडफोनचा वापर करणे तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. चालकांचे लक्ष विचलित झाल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याने बेस्ट प्रशासनाने ही विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेची अंमलबजावणी अत्यंत गोपनीय पद्धतीने केली जात आहे. बेस्टचे साध्या वेशातील अधिकारी प्रवासी बनून बसमधून प्रवास करत असून, चालकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. चालक मोबाईल वापरत आहे का, कानात इअरफोन किंवा हेडफोन लावले आहेत का, वेगमर्यादेचे पालन केले जात आहे का, तसेच सुरक्षित पद्धतीने बस चालवली जात आहे का, याची तपासणी केली जात आहे. चालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई करण्यात येत असल्याने नियमभंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाई होत आहे.
ही मोहीम कुलाब्यापासून गोराईपर्यंतच्या पश्चिम उपनगरांमध्ये तसेच मुलुंडपर्यंतच्या पूर्व उपनगरांसह बेस्टच्या सर्व २७ आगारांमध्ये राबवण्यात येत आहे. मोबाईल वापरणाऱ्या चालकांसोबतच भरधाव वेगाने बस चालविणाऱ्या चालकांवरही प्रशासनाची करडी नजर आहे.
मोबाईल वापरणाऱ्या चालकांना एक हजारांचा दंड
बेस्ट प्रशासनाने वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्या चालकांसाठी कठोर नियम लागू केले आहेत. मोबाईल वापरताना आढळलेल्या प्रत्येक चालकाकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. याशिवाय वारंवार नियमभंग करणाऱ्या चालकांना दुप्पट दंड आकारला जाणार आहे. तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कंत्राटी कंपनीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते.
लक्ष विचलित झाल्याने अपघाताचा धोका वाढतो
वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्याने चालकाचे लक्ष रस्त्यावरील परिस्थितीपासून दूर जाते. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीत ब्रेक लावणे किंवा योग्य निर्णय घेणे कठीण होऊ शकते. तसेच हेडफोन किंवा इअरफोनच्या वापरामुळे इतर वाहनांचे हॉर्न, वाहतुकीतील बदल आणि धोक्याचे संकेत ऐकू येत नाहीत. परिणामी गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते.
बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या जीविताची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची असून, नियम मोडणाऱ्या चालकांविरोधातील ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
