आईवर धावलेल्या वडिलांना रोखताना अभयचा मृत्यू
साईमत /मुंबई /प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून झालेल्या धक्कादायक घटनेत आईचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भाईंदर येथील उत्तन परिसरात घडली. वडिलांच्या हातातील चाकू रोखण्याच्या प्रयत्नात तरुणाच्या बरगडीत चाकू घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव अभय सोनी (वय २४) असे असून तो उत्तन परिसरात वडील विदेशकुमार सोनी, आई पूनम सोनी, भाऊ रोहन आणि बहीण स्नेहा यांच्यासोबत राहत होता. शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरात कौटुंबिक कारणावरून विदेशकुमार आणि पूनम यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही वेळातच वाढला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
या वादादरम्यान विदेशकुमार यांनी स्वयंपाकघरातील चाकू हातात घेऊन पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आईच्या मदतीसाठी अभय तत्काळ मध्ये पडला. वडिलांच्या हातातील चाकू काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना अचानक चाकू अभयच्या बरगडीत घुसला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने अभयला उपचारासाठी उत्तन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र जखम गंभीर असल्याने अखेर अभयचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक तपास करून विदेशकुमार सोनी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने उत्तन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण, वादाची पार्श्वभूमी आणि हल्ल्याची परिस्थिती याचा सखोल तपास केला जात आहे.
