६२५ जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा भाग; जळगावात ‘चूल पेटवा’ निषेध
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि वीज ग्राहकांवर लादल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटर प्रणालीविरोधात ‘बहुजन मुक्ती पार्टी’ यांच्या वतीने देशभरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात आज तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
जळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील काशिनाथ देवरे यांच्या नेतृत्वाखाली जी.एस. मैदान येथे ‘चूल पेटवा आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन विविध मागण्या सादर करण्यात आल्या.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, स्मार्ट मीटरच्या नावाखाली खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे. “वीज बिले अचानक वाढल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय वाढलेल्या गॅस दरांवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. घरगुती गॅस सिलेंडरचे दर १५०० ते २००० रुपयांपर्यंत, तर व्यावसायिक गॅसचे दर २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने सामान्य नागरिक आणि छोटे व्यावसायिक मोठ्या अडचणीत आल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
सरकारसमोर मांडलेल्या प्रमुख मागण्या
आंदोलनादरम्यान पुढील मागण्या करण्यात आल्या
- स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करून पारंपरिक पारदर्शक मीटर बसवावेत
- घरगुती गॅस सिलेंडर ४०० रुपयांत तर व्यावसायिक सिलेंडर ७०० रुपयांत उपलब्ध करावा
- पेट्रोल ९० रुपये आणि डिझेल ८० रुपये प्रति लिटर दराने मिळावे
- वीज बिल न भरल्यास थेट कनेक्शन कट करणाऱ्या खाजगी कंपन्यांवर कारवाई करावी
देशव्यापी आंदोलनाचे टप्पे जाहीर
‘बहुजन मुक्ती पार्टी’ कडून देशातील ६२५ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आंदोलन राबवले जात आहे. पहिल्या टप्प्यात १२ मे रोजी ‘लालटेन भेट’ आंदोलन झाले, तर दुसऱ्या टप्प्यात आज ‘चूल पेटवा आंदोलन’ पार पडले.
आगामी ३१ मे रोजी ‘दे धक्का’ आंदोलन करून पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा जिल्हा नेतृत्वाकडून देण्यात आला आहे.
