साईमत, जळगाव, प्रतिनिधी
येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील डान्स क्लब व म्युझिक क्लबच्या माध्यमातून भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन आणि देशभक्तीपर नृत्य आदी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध जोशपूर्ण देशभक्तीपर गीते तसेच नृत्याचे विलोभनीय व बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेली तिरंगी वेशभूषा स्पर्धेचे आकर्षण ठरले. सदर उपक्रमावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच भावनगर येथील स्वामी शहानंद कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेतल शहा हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमाचे उद्दिष्टे सांगत, भारतात प्रतिभावान युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिच प्रतिभा भारताला सामर्थ्यशाली बनवू शकते, फक्त तरूणांच्या अवलोकन, विश्लेषण आणि परिश्रमातून नवसंकल्पनेला चालना देण्याची गरज आहे.
पूरक वातावरणातून ते शक्य आहे. माझ्या भारताला शक्तिशाली देश बनविण्यासाठी, देशाचा उत्कर्ष साध्य करण्यासाठी, युवकांनी चौकटीबाहेरचा विचार करून सर्वात आधी देश ही भावना संवेदनशील मनाने स्वीकारली पाहिजे, असे मत प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी “मिट्टी को नमन विरो को वंदन” या घोषणा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहिद झालेल्या वीर-वीरांगनांचे स्मरण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या उपक्रमासाठी प्रा. स्वाती पाटील, प्रा. शुभम घोष, प्रा. प्रियंका मुंदडा, प्रा. कविता पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर प्रा. श्रिया कोगटा, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. योगिता पाटील, प्रा. करिश्मा चौधरी, अक्षय दुसाने व लोकेश साळुंखे यांनी स्पर्धेचे समन्वय साधले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.