एकाच दिवशी चार ठिकाणी धडक छापा ८ जण ताब्यात, ३३ हजारांची रोकड जप्त
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरात गुप्तपणे सुरू असलेल्या अवैध जुगार व मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी मंगळवारी जोरदार मोहीम राबवत चार ठिकाणी एकाचवेळी धाड टाकली. या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ३३ हजार ८४० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही मोहीम राबविली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गांधी मार्केट, एमआयडीसी परिसर, आझाद नगर टी-पॉईंट आणि बॉम्बे रेल्वे गेट परिसरातील जुगार अड्ड्यांवर समन्वित कारवाई करण्यात आली.
गांधी मार्केट परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर छापा टाकून नंदलाल गणपत बुरुजवाले (५६) व अशोक गोपाळ महाजन (४९) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २ हजार ६८० रुपयांची रोकड तसेच मटक्याच्या स्लिप, कार्बन व पेन जप्त करण्यात आले.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रीम कॉलनीसमोरील टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या वरली मेनबाजार सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली. या ठिकाणी रहीम मेहताब तडवी, निलेश लक्ष्मण सोनार, आशिक शाहा शहादत शाहा आणि दिपक राजेंद्र सोनार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून १५ हजार ७४० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद नगर टी-पॉईंट येथे सार्वजनिक ठिकाणी ‘मिलन डे’ सट्टा सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दिपक राजाराम रणसिंगे (३८) याला ताब्यात घेत त्याच्याकडून ६ हजार ९९० रुपये आणि सट्ट्याचे साहित्य जप्त केले.
तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बॉम्बे रेल्वे गेटसमोरील पुलाखाली सुरू असलेल्या ‘मिलन डे ओपन’ सट्टा अड्ड्यावरही पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत भरत खेमसिंग गोरखा (३९) याच्याकडून ८ हजार ४३० रुपयांची रोकड, पावती बुक व पेन जप्त करण्यात आले.
दिवसभर चाललेल्या या विशेष मोहिमेत चारही ठिकाणांहून एकूण ३३ हजार ८४० रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणावर जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. सर्व संशयितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस कर्मचारी आवेश शेख, प्रणय पवार, अमोल ठाकूर तसेच संबंधित पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. शहरातील अवैध जुगार व मटका व्यवसायाविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
