भिवंडीत फुटला टीईटीचा पेपर; राज्यभरातील परीक्षा पुढे ढकलली
साईमत /भिवंडी / प्रतिनिधी
देशभरात ‘नीट’ प्रवेश परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाची धग अद्याप कायम असतानाच महाराष्ट्रातही परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (महा-टीईटी) ऐनवेळी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला घ्यावा लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत टीईटीची प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
रविवार, २८ जून रोजी राज्यभरात होणाऱ्या या परीक्षेसाठी सुमारे दोन लाख २६ हजार उमेदवारांनी तयारी केली होती. मात्र, परीक्षेच्या अवघ्या काही तासांपूर्वी प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती समोर आल्याने उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी शनिवारी पहाटे एका संशयित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान काही व्यक्तींकडे आगामी टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळणारे साहित्य आणि प्रश्न आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संबंधित प्रश्नपत्रिका ही मूळ परीक्षेचीच असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
प्रश्नपत्रिका फुटल्याची खात्री झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे उद्या होणारी महा-टीईटी परीक्षा स्थगित करण्यात आली असून परीक्षेची नवीन तारीख लवकरच अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशभरात ‘नीट’ परीक्षेतील गोंधळामुळे आधीच लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असताना, आता महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण लागल्याने परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असून, परीक्षा प्रक्रियेत अधिक कठोर सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
