अडावद वीज महावितरण कार्यालयाला संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले टाळे

0
1

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर

येथुन जवळील चोपडा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या अडावदला कार्यान्वित ३३ के.व्ही. वीज उपकेंद्राच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून पंचक्रोशीतील वटार आणि खर्डी येथील ए.जी.आर. म्हणजेच कृषी पंपाना पुरविण्यात येणारा वीज पुरवठा कमी दाबाचा व बेभरवशाचा झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून तर दोन्ही फिडरवरील शेतीचा वीज पुरवठा खंडीत स्वरूपाचा असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी, ७ फेब्रुवारी रोजी अडावद वीज उपकेंद्राला टाळे ठोकले. आठवड्याभरापासून वटार-खर्डी शिवारातील रात्रीचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच अधिकाऱ्यांविना अडावद सबस्टेशनचा कारभार ‘रामभरोसे’ झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

बुधवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून कमळगाव रस्त्यावरील अडावद वीज उपकेंद्रावर शेकडो शेतकऱ्यांनी धाव घेतली. मात्र, येथील अभियंता सचिन केदारे रजेवर असल्याचे सांगण्यात आले. चोपड्याचे अभियंता एम. आर.साळुंखे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते जिल्हाधिकाऱ्यांसोबत मिटींगला असल्याचे सांगत धानोरा येथील अभियंता कुलकर्णी यांना घटनास्थळी पाठवतो, असे सांगितले. परंतु दोन तास होऊनही कोणताच सक्षम अधिकारी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी आला नाही. त्यामुळे शेतकरी अधिकच संतापले. संतापाच्या भरातच त्यांनी वीज उपकेंद्रास टाळे ठोकत रोष व्यक्त केला.

अडावद वीज उपकेंद्रातून वटार – खर्डी शिवारातील कृषी पंपाच्या फिडरला विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यातच वटार फिडरवर मंगरूळ फिडरच्या १० डी.पी.चा अवास्तव वाढीव लोड दिलेला आहे. तसेच खर्डी फिडरवर अडावद गावाचा गावठाणचा अतिरिक्त लोड दिला आहेे. परंतु गेल्या तीन-चार महिन्यांपासून दोन्ही शेती फिडरवरील वीज पुरवठा कमी दाबाचा आणि अनियमित बेभरवश्‍याचा झाला आहे. सध्या तर फिडरचे भारनियमन कधी सुरु होते आणि बंद होते. त्याचे कुठलेही वेळापत्रक नाही. वीज नक्की किती वाजता येईल, याची कल्पना खुद वीज महावितरणचे कार्यालयही देवू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऐन हंगामातील शेती पिकांना पाणी कसे व केव्हा भरावे, असा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा भाग ओव्हर लोडमध्ये येत असल्याने इतर शेती फिडर बंद झाल्यानंतर वीज उपलब्धता झाली तर वेळी-अवेळी वटार आणि खर्डी शिवारातील शेती पंपाना वीज पुरवठा दिला जातो. पर्यायाने नेहमीच कमी दाबाचा वीज पुरवठा मिळतो. त्यामुळे वारंवार विद्युत रोहित्र जळणे, शेतीचे कृषी पंप जळणे, सतत नादुरुस्त होणे अश्‍या खर्चिक समस्या शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात आहेत. याबाबतीत अडावद-चोपडा-धरणगाव येथील वीज कार्यालयांचे उंबरठे शेतकऱ्यांना झिजवावे लागत आहे. तरीही तोडगा निघत नाही, ही शरमेची बाबच म्हणावी लागेल. शेतकऱ्यांना नेहमी उडवाउडवीचीच उत्तरे दिली जातात. अडावदला सक्षम अधिकारी कार्यान्वित करून वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी २६ जानेवारीच्या ग्रामसभेत केली होती. परंतु शेतकऱ्यांच्या समस्येकडे जबाबदार आमदार-खासदारांसारखे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

वीज समस्येचा प्रश्‍न आला ऐरणीवर

वटार आणि खर्डी येथील शिवारातील वीज समस्येचा प्रश्‍न मोठ्या स्वरुपात ऐरणीवर आल्याने बुधवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून शेकडो शेतकऱ्यांनी अडावद वीज महावितरण कार्यालयावर मोर्चा वळविला. परंतु कार्यालयात वीज अभियंता सचिन केदारे उपलब्ध नसल्यामुळे वीज कर्मचारी राहूल सोनवणे, आर.एस.मनोरे, वाय.एस.पाटील, व्ही.के.महाजन, के.एस.पेंढारकर यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषांचा सामना करावा लागला. संतप्त शेतकऱ्यांनी शेवटी वीज महावितरण कार्यालयास टाळे ठोकले.

निवेदनाद्वारे आंदोलन छेडण्याचा इशारा 

अडावद येथील सहाय्यक अभियंता केदारे आणि धानोरा येथील सहाय्यक अभियंता यांना वरिष्ठांनी अडावद कार्यालयात पोहचण्याच्या सूचना देऊनही ते उपलब्ध न झाल्याने दुपारी उशिरा चोपडा ग्रामीणचे अभियंता एम. आर.साळुंखे अडावदला पोहचले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच वटार फिडरवरील मंगरूळचा अतिरिक्त लोड कमी करण्याच्या सूचना वीज कर्मचाऱ्यांना दिल्या. मात्र, खर्डी शेती फिडरचा प्रश्‍न अद्यापही सोडविण्यात अधिकाऱ्यांना यश आलेले नाही. त्यामुळे खर्डी शेती फिडरवरील अडावद गावठाण आणि शेवरा शेतीचे जे ट्रान्सफार्मरचा लोड कमी करून खर्डी शेती फिडरचा वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे नामदेव पाटील, सोपान पाटील, अनिल पाटील, अनिल न्हावी, भरत पाटील, दिलीप कोळी, मंगल पाटील, चंद्रशेखर पाटील, समाधान पाटील, अण्णा महाजन, देविदास पाटील यांनी दिला आहे. यावेळी वटार शेती फिडरवरील योगराज पाटील, दीपक कोळी, शिवदास महाजन, गिरीश लोखंडे, जीवन माळी, मनोहर पाटील, राकेश पाटील, शरद महाजन, सुनील पाटील, खुशाल पाटील, बबन ठाकरे, समाधान पाटील, धर्मा सपकाळे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here