साईमत न्यूज नेटवर्क –
रत्नागिरी : मैत्री, प्रेमसंबंध आणि सूडाच्या भावनेतून घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने Ratnagiri जिल्हा हादरला आहे. “तू सोहमचा नाद सोडून दे” असा सल्ला दिल्याच्या रागातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणात सोहम म्हात्रे या मुख्य संशयितासह दोन साथीदारांवर सूरज झोरे याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही वेळ आधी सूरज झोरे याने संबंधित तरुणीला “तू सोहमचा नाद सोडून दे” असा सल्ला दिला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून सोहमने कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे.
घटनेचा सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे मृत्यूपूर्वी सूरजने स्वतः रेकॉर्ड केलेला व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये त्याने हल्लेखोरांची नावे घेतल्याचे आणि घटनेची सविस्तर माहिती दिल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सध्या तपासात निर्णायक ठरत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २१ मेच्या रात्री ही घटना घडली. हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत सूरजने आपल्या बहिणीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. “सोहम म्हात्रे, अभिषेक राठोड आणि नजीबुल शेख यांनी कट रचून माझ्यावर हल्ला केला,” असे त्याने सांगितल्याचे तपासात नमूद आहे.
आरोपींनी मैत्रिणीसमोरच सूरजवर कोयत्याने सपासप वार केल्याचेही समोर आले आहे. जीव वाचवण्यासाठी त्याने पळ काढला, मात्र आरोपींनी पाठलाग करून पुन्हा हल्ला केल्याचा आरोप आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून संबंधित तरुणीचा जबाबही नोंदवला जाणार आहे. पोलिसांनी या हत्याकांडाचा सखोल तपास सुरू केला आहे.
