साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी
तापी नदी व पूर्णा नदीच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या २४ तासांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत २६३ मिमी पाऊसाची नोंद झाली. यामुळे तापी नदीला पूर वाढल्याने बुधवारी रात्री दहा वाजता हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. दरम्यान धरणातून सव्वा लाख क्यमेक्स प्रतिसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या आठवड्यात पावसाने दडी मारली होती. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस वाढत आहे. मात्र सोमवारी व मंगळवारी २९९ मिमी पाऊस झाला. यामुळे हतनूर प्रशासनाने मंगळवारी सकाळी आठ वाजता धरणाचे ३६ दरवाजे उघडून विसर्ग केला. तर बुधवारी पुन्हा पावसाचे प्रमाण वाढले. बुधवारी सकाळी साडेआठ ते रात्री सात वाजेच्या दरम्यान २६३ मिमी पाऊस झाला. यामुळे धरणाचे संपूर्ण ४१ दरवाजे रात्री १० वाजता उघडले.