भिंत पडल्याने खा.स्मिताताई वाघांनी केली ‘रसमंजू’ कॉम्प्लेक्सची पाहणी

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील भागवत रस्त्यावरील ‘रसमंजू’ कॉम्प्लेक्समधील भिंत मंगळवारी, १८ जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पडल्याने संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे बेसमेंटमधील व्यावसायिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यासंदर्भात खा.स्मिताताई वाघ यांनी पाहणी करून पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

कॉम्प्लेक्सच्या शेजारील गटार तुंबत असल्याने पाण्याचा निचरा होण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे जोरदार झालेल्या पावसाचे पाणी कॉम्प्लेक्सच्या संरक्षण भिंतीत मुरल्याने भली मोठी भिंत कोसळून संपूर्ण पाणी कॉम्प्लेक्सच्या बेसमेंट शिरले. तेथील सर्व दुकाने जलमय होऊन व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ही बाब दुकानदारांनी खा.स्मिताताई वाघ यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे त्यांनी तातडीने पालिकेच्या मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना गटार मोठी करून त्यात मोठा पाईप टाकण्याच्या सूचना दिल्या. श्री.नेरकर यांनीही लागलीच काम सुरू करण्याची ग्वाही खासदारांना दिली.

दरम्यान, घटनेच्या दिवशी परिस्थिती बिकट असताना नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवा देत रात्री साडे तीन वाजेपर्यंत पंप लावून पाणी काढल्याने खा.वाघ यांनी पालिका कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ज्या व्यावसायिकांचे त्यात मोठे नुकसान झाले आहे अशांना त्यांनी धीरही दिला.

यांची होती उपस्थिती

यावेळी पाटील ॲग्रोचे प्रशांत पाटील, धवल ऑटोचे धवल शाह, जमिनी टेलर्सचे गुलाबराव पाटील, धनश्री सेल्सचे भरत जावदेकर, अक्षरा प्लायवूडचे रुपेश कोतवाल, हिंगलाज मसाज थेरपी सेंटरचे विजयकुमार ढवळे, बालाजी इलेक्ट्रिकचे धनराज बडगुजर यांच्यासह इतर व्यावसायिक तसेच भाजपाचे शहराध्यक्ष विजय राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस राकेश पाटील, देवा लांडगे, राहुल चौधरी, हिरालाल पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here