साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
शहरातील वर्दळीच्या सिव्हिल हाॅस्पिटल समाेरील रस्त्यावर दाेन वर्षांपासून जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात तर या ठिकाणी जलसंधारण अभियान आपसूक राबवले जातेय की काय असे चित्र समाेर आले. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘आप’ने दाेन दिवसांपूर्वी खड्ड्याला पुष्पहार अर्पण करून राेष व्यक्त केला हाेता. त्यानंतर महापालिकेला जाग आली आणि मंगळवारपासून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
सिव्हिल हाॅस्पिटलसमाेर पुष्पलता बेंडाळे चाैक ते पांडे चाैक असा हा रस्ता आहे. इच्छादेवी चाैफुली, सिंधी काॅलनीकडून बाजारपेठेत येण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. हजाराे वाहने राेज या मार्गाने ये-जा करतात. मात्र, या रस्त्यावर खड्डे इतके आहेत की महिनाभरापूर्वी या रस्त्यावर दाेन गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच झाली हाेती. तेव्हापासून लाेकभावना प्रचंड तीव्र झाल्या हाेत्या. आपने यासंदर्भात आंदाेलन छेडून या प्रश्नाकडे लक्ष वेधले हाेते. त्यानंतर डाव्या बाजूचा जुना रस्ता जेसीबीने उकरून काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पंधरा दिवस चालणार आहे. त्यानंतर जाड खडी, त्यावर बारीक खडीकरण हाेईल. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.