आठ महिन्यानंतर अखेर मुक्ताईनगरला मिळाले तहसीलदार

0
2

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुक्ताईनगरला अखेर तहसीलदार म्हणून गिरीश वखारे यांची नियुक्ती राज्य शासनाच्या महसूल विभागाने गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी अध्यादेश काढून केलेली आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाच्या महसूल विभागाने केलेल्या आहे. त्यात श्री.वखारे यांचाही समावेश आहे. गिरीश वखारे हे सध्या तळोदा तहसील कार्यालय, जि.नंदुरबार येथे कार्यरत होते. गेल्या आठ महिन्यात मुक्ताईनगरचे तहसीलदार श्री.वखारे हे चवथे तहसीलदार म्हणून नियुक्त होणार आहेत.

१२ जून २०२३ रोजी मुक्ताईनगरच्या तत्कालीन तहसीलदार श्‍वेता संचेती यांची बदली त्र्यंबकेश्‍वर, जि.नाशिक येथे झाल्यानंतर येथील तहसिलदारांचे पद रिक्त होते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तत्कालीन तहसीलदार संचेती यांच्या बदलीनंतर त्याच दिवशी १२ जून २०२३ रोजी राज्य शासनाच्या महसूल विभागाने नांदुरा, जि.बुलढाणा येथील तहसीलदार डी.एल. मुकुंदे यांची बदली मुक्ताईनगर तहसीलदार म्हणून केलेली होती. मात्र, मुकुंदे हे मुक्ताईनगरला हजर झालेच नाही. नंतर २७ सप्टेंबर २०२३ रोजी धरणगाव, जि.जळगावचे तहसीलदार ज्ञानेश्‍वर काकडे यांची बदली मुक्ताईनगर येथे केली होती. परंतु श्री.काकडे केवळ एक दिवसासाठी मुक्ताईनगर तहसीलदारपदी विराजमान झालेले होते.

श्री.काकडे गेल्यानंतर राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाने अध्यादेश काढून मुंबई विभागातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांची मुक्ताईनगर तहसीलदार म्हणून नियुक्ती केली होती. परंतु श्री.येवलेही मुक्ताईनगरला हजर झाले नव्हते. गेल्या आठ महिन्यात चौथ्यांदा नियुक्ती झालेले नूतन तहसीलदार गिरीश वखारे हे पदभार सांभाळतील का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तत्कालीन तहसीलदार संचेती गेल्यानंतर आठ महिने मुक्ताईनगरच्या तहसीलदारपदी म्हणून निवासी नायब तहसीलदार निकेतन वाडे यांनी प्रभारी पदभार सांभाळला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here