सिव्हिल हॉस्पिटलजवळील भूखंड वाद अखेर मनपाच्या बाजूने
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील सिव्हिल हॉस्पिटलजवळ असलेल्या महापालिकेच्या कोट्यवधी रुपये मूल्य असलेल्या भूखंडावरून निर्माण झालेला वाद अखेर महापालिकेच्या बाजूने निकाली निघाला आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा ॲड. पियुष नरेंद्र (अण्णा) पाटील यांच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर जळगाव महानगरपालिकेने संबंधित जागेवर कारवाई करत भूखंड अधिकृतपणे आपल्या ताब्यात घेतला असून, तिथे मालकी हक्काचा फलकही लावण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचा मौल्यवान भूखंड वाचल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारील हा भूखंड काही वर्षांपूर्वी नर्सिंग होम कॉलेजसाठी देण्यात आला होता. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम न झाल्याने महापालिकेने तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर स्थानिक नागरिक व तरुण या मैदानाचा खेळासाठी वापर करत होते.
मात्र काही दिवसांपूर्वी या भूखंडाभोवती उभारलेली संरक्षण भिंत रात्रीतून तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमागे इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यामुळे परिसरात मोठी चर्चा आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकाराची माहिती मिळताच ॲड. पियुष पाटील यांनी तत्काळ आक्रमक भूमिका घेत महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यांनी या प्रकरणामागे कथित ‘लँडमाफिया’ कार्यरत असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली.
विशेष म्हणजे, सुमारे १० वर्षांपूर्वीही रेडक्रॉस सोसायटीने या भूखंडावर आपला लोगो असलेला गेट लावून कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुरवाडे यांनी तीव्र विरोध दर्शवल्याने तो प्रयत्न अपयशी ठरला होता. आता पुन्हा त्याच प्रकारे जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे ॲड. पाटील यांनी म्हटले आहे.
ॲड. पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महापालिकेने अखेर संबंधित जागेवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करत भूखंडावर आपला ताबा निश्चित केला. तसेच अधिकृत फलक लावून जागेचा हक्क स्पष्ट केला. या वेळी ॲड. पाटील स्वतः उपस्थित होते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ॲड. पाटील यांनी महापौरांकडे केली असून, पुढील कारवाईकडे शहराचे लक्ष लागले आहे.
