महामार्ग मोकळा करण्यासाठी कठोर पाऊल; कारवाईदरम्यान नागरिक संतप्त
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी आक्रमक भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. महानगरपालिका, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू केलेल्या या कारवाईमुळे शहरात दिवसभर खळबळ उडाली. मात्र, या मोहिमेदरम्यान ठिकठिकाणी वाद आणि गोंधळाचे प्रसंगही उभे राहिले.
कारवाईची सुरुवात अजिंठा चौफुलीजवळील कब्रस्थान परिसरातून करण्यात आली. सुरुवातीलाच एका चारचाकी वाहनावर कारवाई करताना संबंधितांनी तीव्र विरोध दर्शविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पथकाने वाहन ट्रॅक्टरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त नागरिकांनी आक्षेप घेतला. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत जमाव शांत केला.
यानंतर मोहीम भंगार बाजार आणि अजिंठा चौफुलीच्या सर्व्हिस रोडकडे वळवण्यात आली. येथे रस्त्याच्या कडेला उभारलेल्या टपऱ्या, भंगार साहित्याचे ढिगारे हटवण्यात आले. या भागात काही व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य केले, तर काही ठिकाणी विरोधाचा सूर अधिक तीव्र होता.
विशेषतः लोटगाडी चालक आणि गॅरेज मालकांनी कारवाईला कडाडून विरोध केला. “आम्ही स्वतःहून गाड्या हटवत आहोत, त्या जप्त करू नका,” अशी विनंती करत असतानाच मनपा कर्मचाऱ्यांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. क्रेनद्वारे साहित्य उचलताना देखील पथक आणि गॅरेज चालकांमध्ये वादावादी झाली.
दरम्यान, काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनावर दुजाभावाचा आरोप करत संताप व्यक्त केला. “मोठ्या धनदांडग्यांकडे दुर्लक्ष करून केवळ छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाते,” असा आरोप करत नागरिक आक्रमक झाले. या गोंधळात सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या काही बँक कर्मचाऱ्यांच्या आणि दुकानदारांच्या दुचाकी वाहनांवरही कारवाई करून ती जप्त करण्यात आली.
ही संपूर्ण मोहीम महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. NHAI च्या विनंतीनुसार सुरू करण्यात आलेली ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महामार्गालगत अतिक्रमण करणाऱ्यांनी कठोर कारवाई टाळण्यासाठी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे हटवावीत, असे आवाहन उपायुक्त पंकज गोसावी यांनी केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
