आदित्य ठाकरेंची आजपासून ‘निष्ठा यात्रा’

0
44

मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांनी आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे महापालिकेतील नगरसेवक फोडायला सुरुवात केल्यानंतर आता ही गळती रोखण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे हे आता स्वत: राज्यभरात फिरून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून शिवसेनेची संघटना पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे (Aaditya Thakceray) यांच्याकडून केला जाईल. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याला ‘निष्ठा यात्रा’असे नाव देण्यात आले आहे. या ‘निष्ठा यात्रेत’ आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाचा दौरा करतील. याशिवाय, आदित्य ठाकरे यांचे मुख्य लक्ष्य हे मुंबई महानगरपालिका असेल. आदित्य ठाकरे मुंबईतील २३६ शाखांना भेटी देणार आहेत. प्रत्येक शाखेत जाऊन आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून आदित्य ठाकरे शिवसेनेच्या २३६ शाखा, गटप्रमुख, शाखाप्रमुख, कार्यकर्त्यांच्या संपर्कात येतील. आता शिवसेनेला याचा कितपत फायदा होईल किंवा आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर किती पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेतच थांबतील, हे आगामी काळात पाहावे लागेल.

तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील एका दिवसाआड शिवसेना भवनात हजेरी लावत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील विविध गटांच्या बैठका घेतल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सातत्याने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वेळ पडल्यास वेगळे चिन्ह घेऊन लढायची तयारी ठेवा, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी सेना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या परतीचे दोर कापले गेल्याची चर्चा आहे.

याशिवाय, बंडखोर आमदारांच्या टीकेचे सर्वाधिक धनी झालेले संजय राऊत हे शुक्रवारपासून नाशिकच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच राऊतांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शिवसेना भविष्यात उभारी घेईल, असे भाकीत वर्तविले आहे. सरकार बदललं असलं तरी आमच्यासाठी संपूर्ण आकाश खुलं आहे. आता शिवसेना जी गरुडभरारी किंवा वाघाची झेप घेईल, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पकडीत येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील लोक चिडून उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. मातोश्रीच्या पाठीत असा खंजीर कसा खुपसला जाऊ शकतो? बाळासाहेबांच्या पुत्राशी अशी दगाबाजी कशी होऊ शकते?, हे प्रश्न जनतेला पडले आहेत. मातोश्रीने ज्यांना भरभरून दिले, ते असे वागले, हे लोकांना पसंत पडलेले नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here