साईमत, धुळे । प्रतिनिधी
जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना झाली आहे. या समितीच्या संयुक्तिक पथकाने दुधात पाण्याची भेसळ आढळलेल्या आठ विक्रेत्यांवर गुरुवारी (ता. १७) कारवाई केली.
समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न-औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, दुग्धव्यवसाय विभाग आदींच्या पथकातील अधिकारी संतोष कांबळे, डॉ. आर. एम. शिंदे, डॉ. अमित पाटील, संतोष दलाल, कृष्णा नेरकर, व्ही. व्ही. गरुड, प्रीतेश गोंधळी, हवालदार रवींद्र बेडसे, दूध तपासणी तंत्रज्ञ मनोज पाटील यांनी तपासणी केली.त्यांनी शहरातील चाळीसगाव रोड, ८० फुटी रोड, वडजाई रोड, पारोळा रोड, गल्ली नंबर ४, साक्री रोड, जमनागिरी रोड, मालेगाव रोड तसेच फेरीवाले दूध विक्रेत्यांकडील दुधाची तपासणी स्वयंचलित उपकरणाद्वारे केली.
कारवाईत एकूण १४ विक्रेत्यांकडील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. पैकी आठ विक्रेत्यांच्या दुधात पाण्याची भेसळ आढळली. भेसळ आढळून आलेले सरासरी ७२५ लिटर दूध नष्ट करण्यात आले. त्यात गायीचे ९० लिटर, म्हशीचे ६३५ लिटर दूध आहे.वैधमापनशास्त्र विभागासह संयुक्त पथकाद्वारे दूध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलयंत्र मुद्रांकनाची पडताळणी करण्यात आली असता काही डेअरीतील मापे अवैध स्वरूपाची आढळली. त्यानुसार सहा दूध विक्रेत्यांवर खटले नोंदविण्यात आले आहेत. दूध विक्रेत्यांनी भेसळ रोखावी, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी केले.