नवी दिल्ली : साईमत लाईव्ह
महागाईची झळ सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला एक मोठा झटका बसला आहे. बुधवारी सकाळी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर (LPG Cylinder Hike)च्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नव्या दर वाढीनंतर राजधानी दिल्लीत १४.२ किलोचा सिलेंडर एक हजार ५३ रुपयांवर पोहोचला आहे. पाच किलोचा छोटा सिलेंडरच्या किमतीत १८ रुपयांनी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या असल्या तरी व्यवसायिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसच्या किंमतीत ८.५० रुपयांनी घट करण्यात आली आहे.
राजधानी नवी दिल्लीत १९ किलोचा गॅस सिलेंडर २ हजार १२.५०, मुंबईत २ हजार १३२, कोलकातामध्ये १ हजार ९७२.५० तर चेन्नईत २ हजार १७७.५० रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत १४.२ किलोच्या गॅस सिलेंडरसाठी १ हजार ५२ रुपये द्यावे लागतील. चेन्नईत यासाठी १ हजार ६८ तर कोलकातामध्ये १ हजार ७९ रुपये मोजावे लागतील.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत याआधी १९ मे रोजी बदल करण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला व्यवसायिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीत एका महिन्यात दुसऱ्यांदा कपात झाली आहे. एक जुलै रोजी त्याच्या किमतीत १९८ रुपयांनी मोठी घट करण्यात आली होती.
व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती (१९ किलो)
दिल्ली- २ हजार १२.५० रुपये
मुंबई- १ हजार ९७२.५० रुपये
कोलकाता- २ हजार १२.५० रुपये
चेन्नई- २ हजार १७७.५० रुपये