गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट ; १२ खासदार व २० माजी आमदार आमच्यासोबत

0
3

साईमत लाईव्ह
जळगाव : प्रतिनिधी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत पक्षाचे ४० आमदार गळाला लावले. तसेच भाजपसोबत येत सरकारही स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेत (Shivsena)मोठी फूट पडली असून हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray)मोठा धक्का मनाला जातो. आता शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटलांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक आमदार आपल्या घरी काल पहिल्यांदा पोहोचले आहे. गुलाबराव पाटील  जळगावात पोहोचल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं नाही, तर त्यांनी आम्हाला सोडले असल्याचे पाटील म्हणाले. येत्या काही दिवसात शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील होणार आहेत.

त्यातील काही आमदारांशी आपण प्रत्यक्षात भेट घेत असल्याचे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरेंनी नेहमी आमच्याकडे दुर्लक्ष केले. उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार केल्याचे पाटील आपल्या समर्थकांना म्हणाले. आम्ही शिवसेना वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे. ते आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे फसविण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करा, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here